Anand Mahindra, Mumbai Corona Zero Death: मुंबईच्या कोरोना लढ्याचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक, म्हणाले हा तर भावनिक क्षण!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 08:25 PM2021-10-17T20:25:27+5:302021-10-17T20:26:24+5:30
Anand Mahindra, Mumbai Corona Zero Death: मुंबईकरांच्या कोरोना विरुद्धच्या (Mumbai Corona Update) लढ्यात आज एक मोठं यश आलं आहे.
मुंबई-
मुंबईकरांच्या कोरोना विरुद्धच्या (Mumbai Corona Update) लढ्यात आज एक मोठं यश आलं आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गेल्या दीड वर्षात असं पहिल्यांदाच घडलं आहे. मुंबईच्या कोरोना लढ्याचं प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही कौतुक केलं आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नसल्याचं ट्विट राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं. याच ट्विटवर आनंद महिंद्रा यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. "खूप मोठी बातमी आहे. आता आपण या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत की जिथं आकडेवारीपेक्षा रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि मृत्यू याकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच मुंबईत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. हा खरंतर खूप भावनिक आणि मैलाचा दगड ठरणारा क्षण आहे. कोरोना लढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्यांचं खूप खूप कौतुक", असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.
Zero is BIG news. We’re at the point where the focus must be on mitigating hospitalisation & deaths rather than case numbers. Coming, as it does, for the 1st time after March 2020, this is an emotional milestone as well. A big cheer for all of you who run this megalopolis. 👏🏽👏🏽👏🏽 https://t.co/nAyhittLDE
— anand mahindra (@anandmahindra) October 17, 2021
मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेटही घटला
मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. उल्लेखनीय बाब अशी की मुंबईत २६ मार्च २०२० नंतर म्हणजेच गेल्या १८ महिन्यानंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ३६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहोचलं आहे. यासोबतच पॉझिटिव्हीटी दर १.२७ टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे १० ते १६ ऑक्टोबरमधील पॉझिटिव्हीटी दर केवळ ०.०६ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. शहरात सध्या ५,०३० सक्रीय रुग्ण आहेत. एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून आज केवळ एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे.
२६ मार्च २०२० नंतर आज प्रथमच मुंबईत एकही कोविड मृत्यूची नोंद झाली नाही. आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अशीच वाटचाल पुढेही सुरू ठेवायची आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावा आणि प्रतिबंधक लस घ्यावी. तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोतच.@mybmc
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 17, 2021
राज्याची आकडेवारी काय सांगते?
राज्याची आकडेवारी पाहायची झाल्यास गेल्या २४ तासांत १७१५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर २६८० जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दुर्दैवानं २९ जणांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या २८ हजार ६३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ६५,९१,६९७ वर पोहोचला आहे. तर आजवर ६४,१९,६७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ३९ हजार ७८९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.