आनंद तेलतुंबडे सीपीआय (माओवादी)चे सक्रिय सदस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:05 AM2021-03-10T05:05:22+5:302021-03-10T05:05:47+5:30
‘एनआयए’ची विशेष न्यायालयाला माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवादप्रकरणी आरोपी असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे हे सीपीआय (माओवादी)चे सक्रिय सदस्य आहेत आणि त्यांच्या संघटनेच्या कामात ते खोलवर गुंतले आहेत, अशी लेखी माहिती ‘एनआयए’ने विशेष न्यायालयापुढे सादर केली. ‘एनआयए’ने २६ फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयात लेखी युक्तिवाद सादर केला. त्याची प्रत मंगळवारी प्रसारमाध्यमांना उपलब्ध झाली.
जानेवारीत आनंद तेलतुंबडे यांनी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. तपास यंत्रणेकडे आपल्याविरोधात पुरावे नाहीत. आपण अन्य लोकांना देशाविरुद्ध युद्ध छेडण्याचे प्रोत्साहन देत असल्याचा तपास यंत्रणेचा आरोप तथ्यहीन आहे, असे तेलतुंबडे यांनी याचिकेत म्हटले आहे.
दाखल करण्यात आलेल्या या याचिकेला विरोध करताना एनआयएने न्यायालयाला सांगितले की, आपल्याविरोधात काहीही पुरावे नाहीत, हा तेलतुंबडे यांचा दावा अत्यंत चुकीचा आहे. उलटपक्षी तेलतुंबडे सीपीआय (माओवादी) चे सक्रिय सदस्य आहेत, हे सिद्ध करणारे अनेक पुरावे आहेत.
या प्रकरणात संरक्षण दिलेल्या साक्षीदारांनी आपला जबाब नाेंदवताना म्हटले आहे की, आनंद तेलतुंबडे
हे आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहत होते; पण परदेशी माओवाद्यांकडचे साहित्य मेमरी कार्डमध्ये सेव्ह करून सीपीआय (माओवादी) च्या केंद्रीय समितीच्या परवानगीनंतर त्याचा वापर प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येत असे.
एनआयएचा इलेक्ट्रॉनिक पुरावे असल्याचा दावा
या प्रकरणातील फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांना आनंद तेलतुंबडे चोरून भेटत असत. तसेच त्यांच्याविरोधात आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक पुरावेही आहेत, असे एनआयएने लेखी युक्तिवादात
म्हटले.