Join us

आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:08 AM

एल्गार परिषदलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा ...

एल्गार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा जामीन विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी फेटाळला. न्या. डी. ई. कोथळीकर यांनी तेलतुंबडे यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. तेलतुंबडे यांच्याविरोधात एनआयएकडे पुरेसे पुरावे आहेत, हा तपास यंत्रणेचा युक्तिवाद स्वीकारत न्यायालयाने तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार दिला.

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात तेलतुंबडे यांना एनआयएने अटक केली. त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. देशाविरुद्ध युद्ध छेडल्याचा व अन्य लोकांना देशाविरुद्ध युद्ध छेडण्यास चिथावल्याचा तपास यंत्रणेचा आरोप निराधार आहे. त्यात तथ्य नाही, असे तेलतुंबडे यांनी जामीन अर्जात म्हटले होते. तेलतुंबडे सध्या नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात आहेत.

एनआयएच्या वकिलांनी या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. तेलतुंबडे यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे, हे सिद्ध करण्यासाठी मौखिक व लेखी पुरावे तपास यंत्रणेकडे आहेत. तेलतुंबडे हे सीपीआय (एम) चे सक्रिय कार्यकर्ते असून ते या संघटनेच्या उपक्रमांचा व कार्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करायचे, असे एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले; मात्र तेलतुंबडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले. पुरावे नसताना एनआयए आपल्यावर आरोप करत असल्याचे तेलतुंबडे यांनी अर्जात म्हटले होते.