एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडे यांचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 06:50 PM2020-04-25T18:50:06+5:302020-04-25T18:52:01+5:30
एल्गार परिषदः : न्यायालयीन कोठडीत रवानगी
मुंबई : शहरी नक्षलवाद आणि एल्गार परिषदेबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अटकेत असलेल्या डाव्या विचारसरणीचे जेष्ठ लेखक डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा तात्पुरता जामीन अर्ज विशेष न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावला. कोरोनाच्या प्रादुर्भावच्या अनुषंगाने त्यांनी सद्यपरिस्थितीत जामिनासाठी केलेली याचिका निकालात काढत आठ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा (यूएपीए) च्या कडक तरतुदींखाली गुन्हा दाखल असलेले तेलतुंबडे हे डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांचे नातजावई असून ते 14 एप्रिल रोजी आंबडेकर जयंती दिनी एनआयएकडे शरण गेले होते. त्यांच्या एनआयए कोठडीची मुदत 25 एप्रिलला संपल्याने त्यांना शनिवारी विशेष न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांच्यासमोर हजर केले. यावेळी त्यांनी तात्पुरते जामीनासाठी अर्ज केला. सध्या कोरोनाचा पादुर्भाव आहे. आपल्याला श्वासोच्छवासाच्या समस्या असून तुरूंगात प्राणघातक संसर्ग होण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. . कोर्टाने त्यांची योग्य दक्षता घेण्याची अधिकार्यांना सूचना करीत जामीन फेटाळला. तेलतुंबडे, नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा आणि इतर नऊ जणांवर बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा (यूएपीए) च्या कडक तरतुदींखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेतील वादग्रस्त वक्तव्यामुळे कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार झाला. असा ठपका पुणे पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला.राज्यात सत्तातर झाल्यानंतर एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने परस्पर एनआयएकडे देण्यात आले आहे.