लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डॉ. अनंत कुलकर्णी यांच्या ३५ वर्षांच्या वैद्यकीय कार्याचे संकलन असणारे ‘अनंता’नुभव पुस्तक खरे म्हणजे अमृतानुभवच आहे. या क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्यांना ते नित्य प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी केले.
दीर्घकाळ सामाजिक क्षेत्रात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. अनंत कुलकर्णी यांच्या अनुभवांचे संकलन असणाऱ्या ‘अनंता’नुभव या पुस्तकाचे गुरुवारी भय्याजींच्या हस्ते प्रकाशन झाले.
भारतातील सर्वात प्रभावी सेवा कार्यांपैकी एक असणाऱ्या आरोग्यरक्षक योजनेचा प्रारंभ हा डॉ. कुलकर्णी यांच्या माध्यमातून त्यांचेच कार्यक्षेत्र असणाऱ्या जव्हार, मोखाड्यात झाला आहे. जनकल्याण समितीच्या माध्यमातून देशभरात रक्तपेढ्यांची साखळी उभारण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केले आहे. दुसऱ्याचे दुःख बघण्याची दृष्टी असल्याशिवाय एवढे व्याप्त सेवा कार्य उभे राहू शकत नाही, असे भय्याजी जोशी म्हणाले.
यावेळी मंचावर डॉ. अनंत कुलकर्णी, या पुस्तकाचे लेखक-ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, गीता कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. विश्व संवाद केंद्र, मुंबई व स्नेहल प्रकाशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
लेखक सुधीर जोगळेकर म्हणाले की, कोणत्याही आमिषाला बळी न पडता सुरुवातीला वेतन न घेता आणि नंतर अत्यल्प मानधनावर तब्बल पस्तीस वर्षे डॉ. अनंत कुलकर्णी यांनी समाजसेवा सुरू ठेवली. संघाच्या माध्यमातून दाई प्रशिक्षण, आरोग्यरक्षक प्रशिक्षण असे अभिनव प्रकल्प त्यांनी सुरू केले. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन अनेक युवक वैद्यकीय क्षेत्राकडे वळतील, अनेक सामाजिक कार्यकर्ते तयार होतील.