Join us

अंनिसने थांबवली मुंबईच्या जत्रेतील नवसाची बळी प्रथा

By admin | Published: July 06, 2017 7:04 AM

देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर म्हणजे मुंबई. आर्थिक राजधानीतही नवसाच्या नावाखाली पशू-पक्ष्यांचे बळी देण्याचे प्रकार उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर म्हणजे मुंबई. आर्थिक राजधानीतही नवसाच्या नावाखाली पशू-पक्ष्यांचे बळी देण्याचे प्रकार उघडकीस येत असतात. असाच एक प्रकार सजग भाविक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)च्या पुढाकाराने थांबविण्यात आला. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव या गावातील श्री देव कोळंबाची जत्रा लोअर परळ येथील ना.म. जोशी मार्गावरील महापालिकेच्या शाळेत भरते. दरवर्षी या जत्रेत कोंबडी आणि बकरे बळी देण्याचा प्रकार घडतो. यंदा, सुरेश मोरये या ग्रामस्थाने याबाबत अंनिसकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांच्या पुढाकाराने बळी देण्याचा प्रकार थांबविण्यात आला. दैवी शक्तीच्या नावाने समाजात भय निर्माण करून बळी देण्याचा प्रकार हा जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पशुबळी देणे हा कायद्याने गुन्हा आहे, अशी भूमिका अंनिसचे राज्य सरचिटणीस नंदकिशोर तळाशिलकर आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे मांडली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईला सुरुवात केली. नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष, सरचिटणीस आणि सदस्यांना याबाबत मनाई आदेश देण्यात आले. पोलीस आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर नांदगाव विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यापुढे असे प्रकार थांबविण्याचे आश्वासन दिले. जत्रेत बळी देण्याचे प्रकार पूर्वी घडत असले तरी या प्रथा आता बंद झाल्या आहेत. ग्रामस्थांमध्येही अंधश्रद्धेबाबत जनजागृती दिसून येत आहे. त्यामुळे बळी देण्याचा प्रकार आता बंद पडला आहे. - गजानन रेवडेकर, ग्रामस्थ

देवाच्या नावाने वेगळेच प्रकार सुरू असतात. देवाचे नाव पुढे करून जे पैसे जमा केले जातात, ते सामाजिक किंवा शैक्षणिक कामासाठी वापरायला हवेत. - सुरेश मोरये, तक्रारदार