पुरातन लेण्या, किल्ल्यांचे तरी जतन व्हावे
By admin | Published: April 18, 2017 03:14 AM2017-04-18T03:14:55+5:302017-04-18T03:14:55+5:30
ठाणे जिल्ह्यातील पुरातन वास्तूंकडे दुर्लक्ष होते आहे. त्याचे जतन, संवर्धन होण्याची गरज आहे. नागरिकांच्या, पुरातत्त्व अभ्यासकांच्या
प्रज्ञा म्हात्रे , ठाणे
ठाणे जिल्ह्यातील पुरातन वास्तूंकडे दुर्लक्ष होते आहे. त्याचे जतन, संवर्धन होण्याची गरज आहे. नागरिकांच्या, पुरातत्त्व अभ्यासकांच्या, जाणत्या इतिहासकारांच्या मदतीने आणि नागरिकांत जागृती करून सरकारने यासाठी पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांनी व्यक्त केली. वेळीच यात लक्ष न घातल्यास हा वारसा नष्ट होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
पुरातत्त्व वास्तूंच्या संवर्धनासाठी मंगळवारी, १८ एप्रिलला साजऱ्या
होत असलेल्या ‘वर्ल्ड हेरिटेज डे’निमित्त ते बोलत होते. ठाण्याला अडीच
हजार वर्षांचा ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास आहे. त्यातील लेणी आणि किल्लेच आता शिल्लक राहिले आहेत. यातील अनेक किल्ल्यांची पडझड झाली आहे. काही किल्ल्यांवर अतिक्रमण झाले आहे. काही किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लेण्यांचीही अवस्था तशीच आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देण्याची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ठाणे जिल्ह्यातील अनेक मंदिरांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. परंतु आता त्यांचे नैसर्गिक सौंदर्य जपण्याची गरज आहे. मध्ययुगात काही वाडे बांधण्यात आले होते. तेही जतन व्हायला हवेत. पण पुनर्विकासाच्या नावाखाली ते तोडले जात आहेत. भिवंडी येथील कवाड भागांत भरपूर ऐतिहासिक चौकोनी पायरीच्या विहिरी आहेत. मला स्वत:ला पायऱ्यांच्या चार विहिरी आढळल्या आहेत. त्या विहिरींचे, त्यात काही खाजगी विहिरी असल्या तरी त्यांचे जतन व्हायला हवे, हा मुद्दा त्यांनी आग्रहाने मांडला.
ठाणे जिल्हा ऐतिहासिक वास्तूंनी नक्कीच श्रीमंत, समृद्ध होता आणि आजही आहे. मात्र, सरकारच्या, राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे आणि लोकांमध्ये न झालेल्या पुरेशा जागृतीमुळे या वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्या वाचविण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असा आग्रह सदाशिव टेटविलकर यांनी धरला.
जपा किल्लेवैभव : ठाणे जिल्ह्यात ज्या किल्ल्यांचे वैभव जपण्याची गरज आहे, त्यात घोडबंदर किल्ला (ठाणे), हिराकोट (ठाणे), दुर्गाडी (कल्याण), मलंगगड (कल्याण), माहुली (शहापूर), गोरक्षगड (मुरबाड), कांबे (भिवंडी), बेलापूर, ढाकभैरी (मुरबाड), सिद्धगड (मुरबाड), गुमतारा (भिवंडी), बलवंतगड (शहापूर), कोहजगड (वाडा) यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू
शीलालेख (चौधरपाडा), लोणाड लेणी (भिवंडी), आम्रेश्वर (अंबरनाथ), शिवमंदिर (आटगाव), कौपिनेश्वर (ठाणे), खिडकाळी (शीळफाटा), खांदेश्वर (वाडा), लोनादित्य (लोणाड - भिवंडी), गुंजकटाई (वाडा), परशुराम (वाडा), रामेश्वर मंदिर (चौधरपाडा), वज्रेश्वरी, गणेशपुरी या ऐतिहासिक वास्तूही जपण्याची गरज आहे.