Join us

फोर्टमधील पुरातन परिसराला मिळणार जुने वैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 5:31 AM

उद्यापासून कामाला सुरुवात : फ्लोरा फाउंटन ते रिगल चित्रपटगृह या नऊशे मीटर परिसराचे सुशोभीकरण

-  शेफाली परब-पंडित 

मुंबई : झपाट्याने विकास होत असलेल्या दक्षिण मुंबईला ‘बिझनेस हब’ म्हणून ओळखले जाते. मात्र बस थांबे, फेरीवाले, झाडांच्या फांद्या अशा अडथळ्यांमुळे येथील परिसराचे पुरातन महत्त्व झाकोळून बकाल स्वरूप आले आहे. ब्रिटिशकालीन वास्तूंमुळे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या परिसराला आता त्याचे जुने वैभव परत मिळणार आहे. फोर्ट परिसरातून या प्रयोगाचा शुभारंभ होत आहे.

ब्रिटिशकालीन इमारती, पाणपोई, वस्तुसंग्रहालय, स्वातंत्र्यसेनानींच्या पुतळ्यांमुळे या परिसराचे परदेशी पर्यटकांनाही आकर्षण आहे. त्यामुळे या पुरातन सौंदर्यात बाधा आणणारे अतिक्रमण हटविण्यात येईल. नुकतेच हुतात्मा चौक येथील फ्लोरा फाउंटनचे नूतनीकरण केले आहे. त्यानंतर आता एम. जी. मार्ग म्हणजे फ्लोरा फाउंटन ते रिगल चित्रपटगृह या नऊशे मीटर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत फोर्ट परिसरात पथदिवे, दिशादर्शक, बस थांब्यांना आकर्षक रूप देण्यात येईल. झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापणे, विकलांग, पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करण्यात येतील.

जबाबदारी ठेकेदाराचीसोमवारपासून काम हाती घेण्यात येईल. १० महिन्यांमध्ये सुशोभीकरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. ते पूर्ण झाल्यावर या परिसराची पुढील तीन वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असेल.सात कोटी ५१ लाखांचा खर्चफोर्ट येथील नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (प्रिन्स आॅफ वेल्स म्युझियम), मुंबई विद्यापीठ या पुरातन वास्तूंचा परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी संपूर्ण फोर्ट परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर दोनदा निविदा मागविण्यात आल्या. रिलायबल एंटरप्रायझेस या कंपनीला काम देण्यात आले आहे. या प्रयोगावर सात कोटी ५१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.