मुंबई - मुंबई विद्यापीठात आता लिथुआनिया, स्लोव्हाकिया, रुमानिया आणि प्राचीन पर्शियातील प्राचीन संस्कृती आणि सभ्यतांचा अभ्यास केला जाणार आहे. मुंबई विद्यापीठात जागतिक संस्कृती आणि सभ्यता यावर विद्यापीठातील शिक्षकांसाठी अल्पकालीन अभ्यासक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठातील यूजीसी-मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर, पुरातत्त्व विभाग, हिंदू अध्ययन केंद्र आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात या अभ्यासक्रमाला मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लिथुआनियाच्या राजदूत डायना मिकविसेनी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, मुख्य वक्ते म्हणून लाभलेले इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजचे संचालक विजय स्वामी, पुरातत्त्व विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश मसराम, हिंदू अध्ययन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. रविकांत सांगुर्डे यूजीसी-मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटरच्या प्रभारी संचालिका प्रा. विद्या वेंकेटेशन यांच्यासह देशभरातून या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेले ३८ शिक्षक उपस्थित होते.