मुंबई : प्रदर्शनादरम्यान बड्या सोने व्यापाºयांसोबत ओळख झाली. ओळखीतून सुरुवातीला छोटे व्यवहार झाले. त्यानंतर केलेल्या मोठ्या व्यवहारामुळे १ कोटी ८० लाख किमतीचे ६ किलो सोने गमावण्याची वेळ एका सोने व्यापा-यावर आल्याची घटना पायधुनीत उघडकीस आली. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.घाटकोपर येथील रहिवासी गणपतलाल वर्दीचंद जैन (५६) यांचा सोने-चांदी होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची मुंबादेवी येथे मेसर्स प्रगती गोल्ड प्रा. लि. कंपनी आहे. अनेक बड्या व्यापाºयांसोबत देशपरदेशात त्यांचे व्यवहार चालतात. वेगवेगळ्या प्रदर्शनात ते सहभाग घेतात. दहा वर्षांपूर्वी गोरेगाव पूर्व येथे भरलेल्या प्रदर्शनादरम्यान त्यांची वर्ल्ड गोल्ड जंक्शन प्रा. लि. या कंपनीचे मालक अंकित घोसालीयासोबत ओळख झाली. याच ओळखीतून घोसालियाने दागिने विकत घेतले. त्याचे पैसेही त्याने वेळेत दिले. याच विश्वासावर गेल्या वर्षी ४ मे रोजी घोसालिया जैन यांच्याकडे परदेशात माल एक्सपोर्ट करायचा आहे. मात्र, माल कमी असल्याने मालाची मागणी केली. आणि दोन दिवसांत मालाचे पैसे देण्याचे आमिष दिले. ठरल्याप्रमाणे जैन यांनी त्यांना १ कोटी ८० लाख किमतीचे ६ किलो ६ ग्रॅमचे सोने दिले. याबाबतची सविस्तर नोंददेखील केली. जैन यांनी त्याच्याकडे पैशांबाबत विचारणा केली असता, कधी गुजरात तर दुबईला असल्याचे कारण पुढे करून घोसालियाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे जैन यांनी पोलिसांना सांगितले.पैशांबाबत पाठपुरावा सुरू असताना महिनाभरापूर्वी घोसालियाने पैसे देण्यास नकार देत धमकी दिली. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत रविवारी पायधुनी पोलिसात तक्रार दाखल केली.
...अन् व्यापा-याने गमावले ६ किलो सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:22 AM