Join us

... अन् एक नेता राहुल गांधींना मिठी मारतो, शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 2:21 PM

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले.

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या विदर्भात असून महाराष्ट्रात या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधींसोबत चालण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोकं सहभागी होत आहेत. त्यामुळे, या यात्रेचे सोशल मीडियावरही फोटो व्हायरल झाले आहेत. राहुल गांधींनी नांदेड येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तर, दोन दिवसांपूर्वी एका सभेत राहुल गांधींनी वि.दा. सावकरांवराना माफीवर म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बोचरी टीका केली. मात्र, तत्पूर्वीच शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यावरुन, आता शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर यांनी शिवसेनेला टोला लगावला.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. यासंदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सावकरांबाबत आपलं मत मांडलं. 'राहुल गांधी जे बोलले ते चूकच आहे. आमच्याबद्दल सांगायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर आहे. स्वातंत्र्यावीरांबद्दल प्रेम कोण व्यक्त करतंय हे देखील पाहावं, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. मात्र, राहुल गांधींच्या विधानानंतर शिंदे गटाने शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला. तसेच, राहुल गांधींसोबत गळाभेट केल्यावरुनही टीका केली, 

सावरकर यांना भारतरत्न द्या ही आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. महाविकास आघाडीच्या काळात हा प्रस्ताव आला होता. मात्र, त्यास पाठिंबा दिला नव्हता. सावरकरांना भारतरत्न द्यायला विरोध कुणाचा आहे हे जगजाहीर आहे. राहुल गांधी सावरकरांबद्दल काहीही बोलतात आणि एक युवा नेता जाऊन त्यांना मिठी मारतो. हे वाईट आहे, असं म्हणत केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. 

गोमुत्र शिंपडणे चुकीचेच

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन वंदन केलं. मुख्यमंत्री स्मृतीस्थळावर गेल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिकडे आले आणि त्यांनी गोमूत्र शिंपडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं. त्यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. गोमूत्र शिंपडले, हे चुकीचे आहे. बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली महाराष्ट्र घडवून देता येणार आहे. बाळासाहेबांचे स्वप्न होते की शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा..तो झालाय, असं ते म्हणाले.

टॅग्स :राहुल गांधीविनायक दामोदर सावरकरशिवसेनाआदित्य ठाकरे