मुंबई : जवळपास अडीच वर्षे आपल्या वाचेविना जगत असलेल्या यवतमाळच्या राहुल पवार या रुग्णाला डॉक्टरांनी आवाज दिला आहे. अडीच वर्षांपूर्वी विषबाधेच्या कारणास्तव त्याच्यावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्या वेळी त्या उपचारांदरम्यान डॉक्टरांनी घशाच्या इथे बाहेरच्या बाजूला ट्रकीयोस्टोमी यंत्र बसविण्यात आले. परंतु आता राहुलवर स्वित्झर्लंड येथील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जे.जे. रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे पुन्हा एकदा अडीच वर्षांनंतर तो सामान्यत: बोलू शकणार आहे.
ट्रकीयोस्टोमी यंत्रामुळे रुग्णाचे बोलणे बंद झाले होते. रुग्णाला बोलायचे असल्यास यंत्रावर हात ठेवून हवेचा विशिष्ट वापर करत बोलावे लागत असे. याविषयी, राहुलची पत्नी सोनू पवार हिने सांगितले की, हे यंत्र बसविल्यापासून त्याचे बोलणे कमी झाले होते आणि ऐन तारुण्यात हा त्रास उद्भवल्याने त्यांना दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण व्हायचा. बोलण्याखेरीज खातानाही थोडासा त्रास व्हायचा, त्यामुळे सतत टेन्शन असायचे.
काही दिवसांपूर्वी पुन्हा त्रास उद्भवल्याने जे.जे. रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला. त्यामुळे इथे आलो आणि रुग्णालयात दाखल झालो. त्यानंतर डॉ. चव्हाण यांनी तपासले आणि परदेशातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर आता राहुलची प्रकृती स्थिर आहे, काही शब्द तो उच्चारू लागलाय, लवकरच पूर्ववत बोलू लागेल. डॉ. फिलीप मागील वर्षीही जे. जे. रुग्णालयाला भेट दिली होती. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या साहाय्याने अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रियांसाठी अधिकाधिक रुग्णांना ते मदत करणार आहेत.