चिपळूण : भाजप-शिवसेना युतीचे केंद्र व राज्य सरकार सर्वच आघाडींवर अपयशी ठरले आहे. निवडणुकीपूर्वी आश्वासनांची खैरात करून मोदी सरकार सत्तेवर आले; पण सत्ता मिळाल्यावर सर्वसामान्यांच्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत. टोलमुक्त करण्याचे आश्वासन तर हवेत विरले. हे सरकार कोणी पाडण्याची गरज नाही, तर ते स्वत:च पडेल. सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, तर महाराष्ट्रात चक्काजाम करू, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला.चिपळूण येथे केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत, शहराध्यक्ष परिमल भोसले, प्रवक्ता प्रभाकर जाधव, बंटी वळंजू, उपनगराध्यक्ष लियाकत शहा, मेघना शिंदे, अश्विनी भुस्कुटे, दीपमाला नाटुस्कर, फैसल पिलपिले, वैभव वीरकर, दिलावर फकीर, बाळ पड्याळ, इनायत मुकादम, आदी अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. रणरणत्या उन्हातून ढोल, ताशे वाजवित भव्य मोर्चा महामार्गाने बाजारपेठेत आला. बाजारपेठेत आल्यावर नीलेश राणे यांनी बैलगाडीत उभे राहून जुने एस.टी. स्टँड येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधानांचे परदेश दौरे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पेट्रोलचे दर, बेरोजगारी या मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य केले. फडणवीस सरकारचे कोणी ऐकत नाही. मंत्री मनमानी करतात. कोकणाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवरही आसूड ओढले.वेळ आल्यास महाराष्ट्रात चक्काजाम करण्याचा इशाराही त्यांनी दिला. आम्ही सदैव जनतेबरोबर राहू, असेही त्यांनी सांगितले. प्रभाकर जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) फक्त आंबे खाऊन गेले...राज्याचे अर्थमंत्री गणपतीपुळे येथे येऊन आंबे खाऊन गेले; पण आंब्याचा भावही दिला नाही. आंब्याची नुकसानभरपाई जाहीर करण्यासाठी यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीची वाट पाहावी लागते.
..तर महाराष्ट्रभर चक्काजाम
By admin | Published: May 23, 2015 12:00 AM