Join us  

...आणि उरला फक्त तिरंगा, धोकादायक इमारतीत राहणाऱ्या आजी-आजोबांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 7:18 AM

पडझड झालेल्या घरावर तिरंगा उरलेला दिसून आला. मुलुंडच्या नाणेपाडा येथील मोतीछाया इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शुक्ला दाम्पत्य राहण्यास होते.

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद त्या दोघांनी जल्लोषात साजरा केला. स्वातंत्र्यसंग्रामातील आठवणींना उजाळा दिला. घरावर तिरंगाही फडकवला. मात्र, स्वातंत्र्यदिनीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. घराचे फ्लोअरिंग कोसळून त्यांचा मृत्यू झाला. देवशंकर शुक्ला (९३) आणि आर्खीबेन (८७) अशी या दुर्दैवी दाम्पत्याची नावे आहेत.

पडझड झालेल्या घरावर तिरंगा उरलेला दिसून आला. मुलुंडच्या नाणेपाडा येथील मोतीछाया इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शुक्ला दाम्पत्य राहण्यास होते. दोन मुली आणि एक मुलगा असे त्यांचे कुटुंब. मुलाच्या विवाहानंतर तो दुसरीकडे राहायला गेला. दोन्ही मुलीही संसाराला लागल्याने शुक्ला पती - पत्नी एकमेकांना आधार देत जीवन कंठत होते.

पडक्या, धोकादायक इमारतीत दोघेही कसाबसा संसार रेटत होते. अन्यत्र राहायला जावे तर गाठीशी पैसा नाही. समोरच्या इमारतीत राहणारी मुलगी त्यांना नेहमी दोन्ही वेळचा जेवणाचा डबा आणून द्यायची. सोमवारी सायंकाळी त्यांच्या घराचे फ्लोअर अचानक कोसळल्याने दोघेही थेट पहिल्या मजल्यावरील घरात आले. या घटनेत शुक्ला दाम्पत्याचा मृत्यू झाला. नवघर पोलीस पुढील तपास करत आहेत.

वेळीच मदत मिळाली असती तर...शुक्ला यांचा नातू राधेश्याम उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनी दोघांनी ‘हर घर तिरंगा’अंतर्गत मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकावला. माझी आईही त्यांना भेटण्यासाठी निघाली होती. मात्र, त्यापूर्वीच या दुर्घटनेची बातमी कानावर पडली. त्यात वेळीच मदत न मिळाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. दोघांचा संसारही जमीनदोस्त झाला. तसेच, शुक्ला यांची मुलगीदेखील नेहमीप्रमाणे   त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जाणार होती. मात्र, त्या तिथे जाण्याआधीच दुर्घटना घडली त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या. गेल्या महिन्यातच मोतीछाया इमारतीला धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले होते. तसेच पगडी सिस्टमच्या या इमारतीत मालकानेही दुर्लक्ष केल्याचा आरोप उपाध्याय यांनी केला आहे.

टॅग्स :मुंबई