लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा दिवस आपण विसरू शकत नाही. त्या दिवशी मी मुंबईबाहेर होतो. मुंबईतील घटनेची माहिती समजताच प्रथम विजय साळसकरांना फोन केला. तेव्हा त्यांनी सांगितले की, मी आता घरी असून लगेचच घटनास्थळी जात आहे. काही वेळाने मी त्यांना पुन्हा फोन केला, पण तो फोन उचलला गेलाच नाही आणि ती दुर्दैवी घटना घडली. बारा वर्षे झाली, यापुढेही कित्येक वर्षे उलटतील, पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरून निघणाऱ नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात गुरुवारी आयोजित हुतात्मा दालन उद्घाटन व हिंमत तुल्य या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. शहिदांचे कुटुंबीय विनीता अशोक कामटे, स्मिता विजय साळसकर, तारा ओंबळे, मानसी शिंदे तसेच जिजाबाई आलम यांच्या हस्ते हुतात्मा दालनाचे उद्घाटन करण्यात आले.मुख्यमंत्री म्हणाले, नक्षलवादी, अतिरेक्यांपासून, भुरट्या चोरांपर्यंत सर्वांना पकडणारा पोलीस महत्त्वाचा घटक आहे. त्याला सुदृढ ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढे अतिरेकी हे महाराष्ट्र, मुंबईवर हल्लाच काय, पण मुंबईचे नावही घेऊ शकणार नाहीत, त्यांना धडकी भरेल असे आपण पोलीस दलाचे भक्कम सक्षमीकरण करू. पोलिसांची कामे जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याकरिता अशा हुतात्मा दालनाची संकल्पना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच महाराष्ट्रात सर्वत्र राबविण्यात यावी असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी दालन राहणार खुलेविविध घटनांमध्ये शहीद झालेल्या ७९७ हुतात्म्यांची एकत्रित माहिती या दालनात उपलब्ध आहे. तसेच विविध लघुपटांद्वारे पोलिसांच्या शौर्याची माहिती दालनातून दिली जाते. माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सुरू केलेल्या हुतात्मा दालन निर्मितीची परिपूर्ती झाल्याबद्दल पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी समाधान व्यक्त केले. सध्या हे दालन रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याचे नियोजन असून भविष्यात ते सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिले जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.