..तर आरोग्य सेवेचा दर घसरेल
By admin | Published: June 29, 2017 03:09 AM2017-06-29T03:09:28+5:302017-06-29T03:09:28+5:30
‘कट प्रॅक्टीस’ विरोधात एशियन हार्ट इन्स्टिट्यूटने सुरू केलेल्या लढ्यात सर्व डॉक्टरांनी सहभागी व्हायला हवे. सर्व डॉक्टरांनी मिळून
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘कट प्रॅक्टीस’ विरोधात एशियन हार्ट इन्स्टिट्यूटने सुरू केलेल्या लढ्यात सर्व डॉक्टरांनी सहभागी व्हायला हवे. सर्व डॉक्टरांनी मिळून ‘कट प्रॅक्टीस’ला आळा घातला तरच आरोग्य सेवेचा दर २० ते २५ टक्क्यांनी कमी होईल, असे मत मुंबईतील एशियन हार्ट इन्स्ट्यिूटमध्ये बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत विविध क्षेत्रातील डॉक्टरांनी व्यक्त केले.
एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विजय डिसिल्व्हा म्हणाले की, गेल्या ४० वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात कट प्रॅक्टिसचा आलेख वाढत आहे. गेल्या काही वर्षांत नवोदित डॉक्टरांना यासाठी त्यांच्या मनाविरूद्ध सक्ती केली जात असल्याचे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. तर कट प्रॅक्टिसविरुद्धचा हा लढा सुरू केलेले डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगितले की, अधिकाधिक डॉक्टरांनी या लढ्यात सहभागी व्हावे. रुग्णालय प्रशासनानेही आपल्या धोरणात याचा समावेश करायला हवा, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
पुढील वर्षीच्या सुरूवातीस आॅक्सफर्ड विद्यापीठातर्फे आम्ही ‘हेलर्स किंवा प्रेडेटर’ या पुस्तकाचे प्रकाशन करत आहोत. या पुस्तकात ४० प्रकरणांचा समावेश असून, या पुस्तकाद्वारे कट प्रॅक्टिसच्या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगातील इतरही देशात कट प्रॅक्टिस करण्यात येते. मात्र त्याला आळा घालणाऱ्या यंत्रणाही त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आपल्या देशात ही यंत्रणा नाही, अशी खंत डॉ. समीरन नंदी यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. गुलापल्ली म्हणाले की, कट प्रॅक्टिस पूर्णपणे थांबविणे हे सोपे नाही. त्याच्या मुळाशी गेले पाहिजे. यासाठी वैद्यकीय शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. याशिवाय कट प्रॅक्टिस विरोधात जनजागृती करणाऱ्या तज्ज्ञांच्या चमूने जगभर नवोदित डॉक्टारांना मार्गदर्शन केले पाहिजे.
परिषदेच्या समारोपावेळी डॉ. हिम्मतराव बावस्कर म्हणाले की, आरोग्य सेवा क्षेत्राला कट प्रॅक्टिस हा झालेला हा दीर्घ आजार आहे. मी या विरोधात २००६पासून संघर्ष करत आहे. ज्यावेळी मला रुग्णाचा रेफरन्स द्यायचे पाचशे रुपये मिळाले होते, तेव्हा याविषयी मी तक्रार केली होती. परंतु काहीच घडले नाही. त्यानंतर एका रेडिओलॉजिस्टने मला बाराशे रुपयांचा धनादेश दिला होता. त्याविषयी मी त्वरित महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्याला मेमो देण्यात आला होता. त्यामुळे डॉक्टरांकडून आकारण्यात आलेल्या कमिशनविरोधात आपण आवाज उठविलाच पाहिजे. यावेळी हेल्थस्प्रिंगचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गौतम सेन, आयएमए मीरा-भार्इंदरचे उपाध्यक्ष डॉक्टर विक्रांत देसाई आदींनीही आपली मते मांडली.