लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेली आठ दशके ज्यांच्या स्वरांची मोहिनी गानरसिकांवर आहे, त्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या रेडिओवरील पहिल्या गाण्याला बुधवारी ७९ वर्षे पूर्ण झाली. दस्तरखुद्द लता मंगेशकर यांनीच ही माहिती समाज माध्यमांमध्ये उघड केली.
“१६ डिसेंबर, १९४१ रोजी रेडिओवर प्रथम गायले. दोन नाट्यगीते गायली होती. जेव्हा माझ्या वडिलांनी ती गाणी ऐकली, तेव्हा ते खूप खूश झाले. त्यांनी माझ्या आईला सांगितलं ती, लताला आज रेडिओवर ऐकून मला खूप आनंद झाला. आता मला कसलीही चिंता नाही,” अशा शब्दांत लता मंगेशकर यांनी त्या दिवसाची आठवण सांगितली आहे.
रेडिओवर गाण्यापूर्वी लता मंगेशकर यांना वडील दीनानाथ मंगेशकर यांच्यासोबत नाटकातून छोट्या-छोट्या भूमिका करण्यास सुरुवात केली होती. १९३८-३९मध्ये त्यांच्या बलवंत संगीत मंडळीच्या ‘सौभद्र’ या नाटकाचा प्रयोग होता. त्यात नारदाची भूमिका करणारा नट आजारी पडला. तेव्हा लता मंगेशकर यांनी ती भूमिका केली. त्यावेळी त्यांचे वय होते नऊ वर्षांचे. ‘राधाधर मधुमिलिंद’ आणि ‘पावना वामना’ ही पदे गायली. एवढेच नव्हे, तर प्रत्यक्ष दीनानाथांच्या देखत वन्समोअरही मिळविला. ही आठवणही लता मंगेशकर यांनीच दूरदर्शनवरील ‘कल्पवृक्ष कन्ये’साठी या कार्यक्रमात सांगितली होती.
पुढे ‘पुण्यप्रभाव’मधील युवराज, ‘त्राटिका’ नाटकातील तान्या या भूमिका त्या करत असत. ‘भावबंधन’मधील ‘लाडकी असेचि पोर’ हे पद किंवा त्राटिकामधील ‘बगितलं ग्वाड पाखरू’ ही लावणी ही त्यांची पेटंट गाणी असत. सोलापूरला पितापुत्रीचा जलसा झाला, त्यात त्यांनी खंबावती रागातील एक चीज आणि दोन नाट्यपदेही म्हटली.
एप्रिल, १९४२ मध्ये दीनानाथांचे अकाली निधन झाले. मंगेशकर परिवाराची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर आली. त्यांचे संगीत नाटक सुटले. मग सिनेमातील भूमिका आणि गाणी सुरू झाली. पुढे सगळा इतिहास गानरसिकांच्या साक्षीने घडला आणि दीनानाथांचे आता कसलीही चिंता नाही, हे उद्गार गेली आठ दशके तंतोतंत खरे उतरले आहेत.