- राज चिंचणकर
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन येऊ घातले असले, तरी एकूणच नाट्य संमेलनाच्या या प्रक्रियेतून जाताना या संमेलनाआधीच त्यातले ‘नाट्य’ रंगू लागल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड होण्याच्या अंकापासूनच या नाट्याचा पडदा वर गेला आहे. यापुढच्या नाट्य प्रवेशांमध्ये नक्की कोणते रंग भरले जातील आणि यात प्रमुख भूमिका कोण साकारतील, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या ज्या बैठकीतून आगामी नाट्य संमेलनाध्यक्षांची निवड होण्याचे जवळजवळ नक्की झाले होते; त्या बैठकीतच वादळी वारे वाहिल्याचे वृत्त आहे. याला निमित्त ठरली आहे, ती यंदा होऊ घातलेली नाट्य परिषदेची निवडणूक! या निवडणुकीतून जी कार्यकारिणी पदभार स्वीकारेल, तिने आगामी नाट्य संमेलनाची जबाबदारी घ्यावी, असा सूर या बैठकीत उमटला आणि नाट्य संमेलनाध्यक्षांची अपेक्षित निवड लांबणीवर पडली. त्याचप्रमाणे ९८ वे नाट्य संमेलन आयोजित करण्यासाठी नाट्य परिषदेच्या नाशिक व जळगाव या दोन शाखांकडून जी निमंत्रणे आली होती; त्यांनी आयत्या वेळी माघार घेतल्याची चर्चाही नाट्य वर्तुळात रंगलीआहे.नाट्य परिषदेच्या १२ नोव्हेंबर रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याने, एकूणच या नाट्याविषयी उत्सुकता वाढली आहे. कीर्ती शिलेदार, श्रीनिवास भणगे आणि सुरेश साखवळकर या तिघांमध्ये नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चुरस आहे आणि १२ नोव्हेंबरला संमेलनाध्यक्षांची निवड होईल, असे नाट्य परिषदेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. याच दिवशी आगामी नाट्य संमेलनाध्यक्ष निवडला जाईल, असा सूर नाट्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीने लावला आहे. दरम्यान, नाट्य परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल येत्या डिसेंबर महिन्यात वाजण्याची चिन्हे आहेत....तर नवे प्रश्नचिन्हनाट्य परिषदेच्या निवडणुका पार पडल्यावरजी नवीन कार्यकारिणी निवडून येईल, तिनेच नाट्य संमेलनाचे सुकाणू हाती धरावे, असाही एक मतप्रवाह नाट्य परिषदेत आहे. असे झाले तर नाट्य संमेलनाध्यक्षांची निवड; तसेच नाट्य संमेलनाची स्थळनिश्चिती याबाबत नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.