Join us

...आणि फडणवीसांनी शिंदेंसमोरचा माईक खेचला, सरकारचे नाथ एकनाथ, पण दबदबा देवेंद्रांचाच?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 1:53 PM

Eknath Shinde, Devendra Fadanvis: १०६ आणि आणखी काही आमदारांचा पाठिंबा असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद सांभाळत असल्याने या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचं वर्चस्व राहणार की देवेंद्र फडणवीस याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात अधिवेशनादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेतील एका दृष्यामुळे या चर्चेला बळ मिळालं आहे.

मुंबई - राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर ठाकरे सरकार जाऊन भाजपाच्या पाठिंब्याने शिंदे सरकार सत्तेवर आले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सोमवारी विधानसभेमध्ये विश्वासमत जिंकत आपलं सरकार भक्कम असल्याचं दाखवलं आहे. मात्र पाठीमागे १०६ आणि आणखी काही आमदारांचा पाठिंबा असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद सांभाळत असल्याने या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचं वर्चस्व राहणार की देवेंद्र फडणवीस याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात अधिवेशनादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेतील एका दृष्यामुळे या चर्चेला बळ मिळालं आहे.

त्याचं झालं असं की, काल संध्याकाळी अधिवेशन आटोपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रश्नांना उत्तरं देत असताना अचानक फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक खेचला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळेच अवाक झाले. आता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहे.

त्याचं झालं असं की, पत्रकार परिषदेदरम्यान, एकनाथ शिंदेंना संतोष बांगर हे कोणत्या पक्षातून तुमच्या पक्षात आले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाने एकनाथ शिंदे गोंधळले. काय उत्तर द्यावं हे त्यांना कळेना, कुठल्या पक्षामधून काय, ते शिवसेनेतून आलेत ना, असं ते म्हणाले. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोरून माईक खेचला आणि सूत्रे आपपल्या हाती घेतली. संतोष बांगर हे शिवसेनेतून खऱ्या शिवसेनेतून आले, आतापर्यंत ते चुकीच्या गटात होते, असं हजरजबाबी उत्तर फडणवीसांनी दिलं.

एवढं बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माईक पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे दिला. या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी चातुर्याने शिंदेंना यक्षप्रश्नातून सोडवलं तरी यापुढे या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी वरचष्मा हा फडणवीसांचा राहील, असे संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकार