Join us

...तर शरद पवारांविरोधात लढू - महादेव जानकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 6:14 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. पवारांची उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. पवारांची उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. भाजपाने संधी दिली तर माढ्यातून आपण पवारांच्या विरोधात लढू. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणे जास्त आवडेल, अशा शब्दांत जानकरांनी खासदारकीची इच्छा बोलून दाखवली.शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवावी, यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवारांचा प्रभाव आता कमी झाला आहे. पूर्वीसारखी स्थिती आता राहिली नाही. त्यांना या वयात निवडणूक लढवावी लागते हे त्यांचे अपयश आहे, असे जानकर म्हणाले.शरद पवारांना जर टक्कर द्यायची असेल तर त्यांच्या विरोधात भाजपाने आपल्याला तिकीट द्यावे. मात्र मी कमळाच्या चिन्हावर लढणार नाही. माझ्याच पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार. भाजपाचा महाल असला तरी रासपची झोपडी आहे. आम्ही महालात जाणार नाही; परंतु भाजपा प्रणीत एनडीएचा भाग राहू, असेही जानकर म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीसह माढा, परभणी, बीड, ईशान्य मुंबई, अमरावती या सहा जागा रासपला मिळाव्यात, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, २४ फेब्रुवारीला मुंबईत धनगर आरक्षण अंमलबजावणी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनगर आरक्षणाबाबत चांगली बातमी देणार आहेत, असेही जानकर म्हणाले.

टॅग्स :महादेव जानकरलोकसभा निवडणूक २०१९