...आणि एका महिलेच्या सुपीक कल्पनेतून सिग्नलवर आली स्त्री पुरुष समानता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 05:37 PM2020-08-11T17:37:24+5:302020-08-11T17:37:56+5:30
वाहतूक सिग्नलमध्ये पुरुष पात्राऐवजी स्त्री पात्र असलेले चिन्ह दर्शविण्यात येत आहे.
मुंबई : सिग्नलवरील चित्रामध्ये आपणास यापूर्वी केवळ पुरुषाचे चिन्ह पाहण्यास मिळत होते. मात्र आता यामध्ये बदल करण्यात येत आहेत. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर सिध्दीविनायक मंदिर ते माहिम पोलीस ठाण्यादरम्यान १३ जंक्शनवरील वाहतूक सिग्नलमध्ये पुरुष पात्राऐवजी स्त्री पात्र असलेले चिन्ह दर्शविण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे एका महिलेच्या सुपीक कल्पनेतून सिग्नलवर ही स्त्री पुरुष समानता आली असून, केवळ स्त्री पुरुष नाही तर समाजातला प्रत्येक घटक सिग्नलवरील चिन्हात आले पाहिजे, असे मत नोंदविण्यात आले आहे.
द अर्बन प्रोजेक्टच्या सह संस्थापक विजयश्री पेडणेकर यांची ही कल्पना असून, त्यांनी सांगितले की, दादर येथील फुटपाथ ब-यापैकी व्यवस्थित आहे. येथे पूर्वीपासूनच सांस्कृतिक रंग दर्शविण्यात आले होते. मात्र महापालिकेने आम्हाला विचारले की आत आणखी काय भर घालता येईल. तेव्हा आम्ही महापालिकेला एक प्रस्ताव दिला. आणि महत्त्वाचे म्हणजे एका महिन्यात हा प्रस्ताव मंजुर झाला. हा प्रस्ताव कोणता होता तर सिग्नलवर स्त्री पुरुष समानता यावी. त्यानुसार, दादर येथील वीर सावरकर मार्ग येथील जंक्शनवरील सिग्नलवर पुरुषाऐवजी महिलेचे चित्र/चिन्ह आले. केवळ हाच परिसर नाही तर लगतच्या सिग्नलवर महिलेचे चित्र/चिन्ह यावे. देशभरात असा प्रयोग कुठेच झालेला नाही. मुंबईत पहिल्यांदा हा प्रयोग झाला आहे. तर जगभरात बहुतांश ठिकाणी सिग्नलवर महिलेचे चित्र/चिन्ह आहे. आमचे म्हणणे असे आहे की केवळ सिग्नलच असे नाही; आणि महिलेचे चिन्ह आले पाहिजे असे नाही. तर शाळेचे विद्यार्थी, दिव्यांग अशी चिन्हे देखील सिग्नलवर आली पाहिजे. समाजातला प्रत्येक घटक सिग्नलवर आला पाहिजे.
वाहतूक शाखेने यासाठी परवानगी दिली आहे. जगभरात असे प्रयोग होत असले तरी देशात असा प्रयोग पहिल्यांदा मुंबईत झाला आहे. येथील सिग्नलमध्ये स्त्री आणि पुरुष आकृती दर्शविण्यासाठी स्वतंत्र वर्तुळाकार बॉक्स बसविण्यात येत आहेत. विशेषत: पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या स्त्री पुरुष समानतेचे कौतुक करत याबाबतची छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड केली आहेत. आणि मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर वॉर्डला शाबासकी दिली आहे. येथील जंक्शनमध्ये सिध्दीविनायक मंदिर येथील ८ सिग्नल, किर्ती कॉलेज ८, म्हात्रे चौक ८, सुर्यवंशी हॉल जंक्शन ८, चैत्यभूमी ८, केळूस्कर मार्ग दक्षिण जंक्शन ८, केळुस्कर मार्ग उत्तर जंक्शन ८, रोड नंबर ५ जंक्शन ८, टि.एच. कटारिया मार्ग जंक्शन ८, हिंदुजा रुग्णालय ८, शितला देवी मार्ग जंक्शन ८, मखदुम शाह दर्गा ८ आणि माहीम पोलीस ठाणे २४ सिग्नलचा समावेश असून, एकूण सिग्नलची संख्या १२० आहे. या सिग्नल यंत्रणेस वरळी येथील वाहतूक शाखेने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.