Join us

...आणि हरवलेला हर्ष घरी परतला

By admin | Published: May 27, 2014 12:24 AM

खांदा वसाहतीत राहणारा तीन वर्षीय हर्ष हा रविवारी आपल्या वडिलांबरोबर पनवेल शहरातील शिवाजी चौक उद्यानात आला होता

पनवेल : खांदा वसाहतीत राहणारा तीन वर्षीय हर्ष हा रविवारी आपल्या वडिलांबरोबर पनवेल शहरातील शिवाजी चौक उद्यानात आला होता व त्या ठिकाणावरून तो हरवला होता. परंतु त्याने चातुर्याने व स्वत:तील असलेल्या चुणचुणीतपणामुळे ही बाब रस्त्यातील काकांना सांगितली व त्यांच्या मोटारसायकलवर बसून तो न चुकता चिंचपाडा गावातून आपल्या घरी सुखरूप परतला. यावेळी त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. हर्ष हनुमंत हुलवान (३) हा आपले आई, वडील व दोन बहिणींसह खांदा वसाहत येथील सेक्टर ८ साई सदन सोसायटीमध्ये राहतो. त्याच्या वडिलांचे मेडिकलचे दुकान असून रविवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास तो आपल्या वडिलांबरोबर पनवेल शहरातील शिवाजी चौक परिसरात असलेल्या उद्यानात खेळण्यासाठी आला. इतर मुलांसह त्या ठिकाणी तो खेळत असताना अचानकपणे वडिलांच्या डोळ्यासमोरून तो नाहीसा झाला. वडिलांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच याबाबतची माहिती आपल्या पत्नीला सुद्धा कळविली. यावेळी हर्ष हा उरण रोड रस्त्यावरून टपालनाका, कोळीवाडा असे करीत चालत चालत तो चिंचपाडा या गावाजवळ पोहोचला. याच ठिकाणी जागरूक नागरिक वसीम फकीर मोहम्मद शेख यांचे मटण विक्रीचे दुकान असून ते कामानिमित्त त्यावेळेस दुकानाबाहेर चालले असतानाच त्यांच्या दृष्टीस हा मुलगा पडला. त्याला जवळ घेवून आस्थेने विचारपूस केली असता त्याने आपण खांदा वसाहतीत राहत असून घरी चाललो असल्याचे सांगितले. यावेळी वसीम शेख यांना कळले की हा मुलगा हरवला आहे. त्याला आपल्या मोटारसायकलवर घेवून तू घर दाखवू शकतो का असे विचारले असता याच चुणचुणीत हर्षने तत्काळ हो असे उत्तर देवून मार्ग दाखवायला सुरुवात केली. खांदा वसाहतीत सिग्नल, त्यांच्या घराजवळ असलेले मिठाईचे दुकान, ते राहत असलेली सोसायटी व त्यानंतर आपले घर त्याने दाखविले. गेले दोन ते अडीच तासांपासून हवालदिल झालेले हुलवान कुटुंबीय देवाचा धावा करीत होते व देवदूतासारखाच वसीम शेख हर्षला घेवून त्याने त्यांच्या घराची बेल वाजविली.दारात हर्ष बघून आईची दोन मिनिटांसाठी दातखिळीच बसली व डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडू लागले. या दरम्यान हनुमंत हुलवान यांनी पनवेल शहर पोलिसांना सुद्धा मुलाबद्दलची माहिती दिली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरु होता.