मुंबई - घाटकोपर येथे दारू पार्टी करून पाच मित्र फिरण्यासाठी मरिन ड्राइव्हच्या दिशेने भरधाव वेगाने निघाले. सायन परिसरात वेगावरचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकली. अवघ्या काही सेकंदांतच कारने पेट घेतला. याच बर्निंग कारमधून एकजण आगीच्या वेढ्यातच बाहेर पडण्याची धडपड करत होता. अखेर मित्रांनी त्याला त्याच अवस्थेत बाहेर काढले. तर, गाडीचा दरवाजा लॉक झाल्याने दोन भावंडांचा डोळ्यांदेखत होरपळून मृत्यू झाल्याचा थरार प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातून समोर आला. या अपघातात हर्ष कदम हा ७० टक्के भाजला असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
सायन पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई प्रमोद नरहरी पदमन (वय ५१) यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी नवी मुंबईला राहणाऱ्या कुणाल अत्तर (३३) विरोधात गुन्हा नोंदविला आहे. या बर्निंग कारमध्ये, मानखुर्द मंडाला भागात राहणारे अजय वाघेला, प्रवीण ऊर्फ प्रेम वाघेला या भावंडांचा मृत्यू झाला आहे.
कार जात होती वेगाने प्रत्यक्षदर्शीं योगेश धनंजय पाटील व मनीष मोहन गुरव यांच्या जबाबातून समोर आलेल्या माहितीत, कार ही सायन पुलावरून भरधाव वेगाने येऊन दुभाजकाला धडकली. अचानक गाडीतून धूर येण्यास सुरुवात झाली. त्यावेळी चालकाच्या सीटवरून कुणाल बाहेर पडला. त्यापाठोपाठ भोईर बाहेर पडताच गाडीने पेट घेतला. हर्ष हा आगीने होरपळलेल्या अवस्थेतच कारमधून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता. दोघांनी त्याला बाहेर खेचले.
ते डोळ्यांदेखत जळत होते... दुसरीकडे, बर्निंग कारमधून पाटील आणि गुरवने गाडीच्या पाठच्या सीटवर बसलेल्या वाघेला बंधूंना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा लॉक झाल्याने ते दोघे आतच अडकले. दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले. दोघांच्या मदतीनेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यामध्ये कदमची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अत्तरला अटक केली असून ते अधिक तपास करत आहेत.