...आणि तो झाडावरच अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:09 AM2020-12-30T04:09:28+5:302020-12-30T04:09:28+5:30
दीड तासांच्या थरारानंतर उतरविले खाली, मुलुंडमधील घटना ...आणि तो झाडावरच अडकला दीड तासांच्या थरारानंतर उतरविले खाली, मुलुंडमधील घटना लोकमत ...
दीड तासांच्या थरारानंतर उतरविले खाली, मुलुंडमधील घटना
...आणि तो झाडावरच अडकला
दीड तासांच्या थरारानंतर उतरविले खाली, मुलुंडमधील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नारळ तोडत असताना अचानक तरुणाला भुरळ आली. त्याने मित्राला कॉल करून मदतीसाठी बोलावले. अशात तरुण खाली पडणार असल्याचे लक्षात येताच स्थानिक तरुणाने मदतीसाठी झाडावर धाव घेतली. घटनेची वर्दी लागताच अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले. अखेर, एक ते दीड तासाच्या थरारानंतर त्याला खाली उतरविण्यास यश आले.
मुलुंड कॉलनीच्या राहुलनगर परिसरात दिनेश पाटील हा कुटुंबीयांसोबत राहतो. तो नारळ तोडण्याचे काम करतो. मंगळवाऱी दुपारी कामगार रुग्णालयाच्या आवारातील नारळाच्या झाडावर तो चढला. नारळ तोडत असताना अचानक पावणेतीनच्या सुमारास मित्र ब्रॅण्ड पिंटोला कॉल करून चक्कर येत असल्याचे सांगितले. पिंटो हॉस्पिटलच्या गेटवरच होता. सुरुवातीला तो मस्करी करतोय असे वाटून त्याने दुर्लक्ष केले. मात्र अरे ‘आई शपथ.. मी खाली पडेन’ म्हणत कॉल कट करताच तरुणाने तेथे धाव घेतली. त्याच दरम्यान पाटील पडणार असल्याचे दिसताच, तेथील वसाहतीत राहणाऱ्या अनिल उतेकर या तरुणाने त्याच्याकडे धाव घेतली. तोपर्यंत पाटील हा खाली उतरताना बाजूच्या बदामाच्या झाडावर बेशुद्ध झाला होता.
तेथे असलेल्या प्रत्यक्षदर्शी किरण शिरसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही तत्काळ अग्निशमन दलाला याबाबत कळविले. अर्ध्या तासाने पथक तेथे फक्त जाळी आणि दोरी घेऊन दाखल झाले आणि त्या मुलाला खाली फेकण्यास सांगू लागले. मात्र यात त्याच्या जिवाला धोका होता. अखेर पुन्हा अन्य साहित्य घेऊन येत साधारण दीड तासाच्या थरारानंतर पाटीलला खाली उतरवले. तोपर्यंत उतेकर हा तरुण पाटीलला पकड़ूनच झाडावर होता.
तरुण जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. अद्याप तो शुद्धीवर आलेला नाही. त्याला चक्कर आल्याची माहिती समोर आली आहे.
...