Join us

...आणि मी खऱ्या अर्थाने ‘हास्या’चा बाप झालो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:05 AM

‘फादर्स डे’ विशेषमराठी रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक व अभिनेता अशी मुशाफिरी करणारे संतोष पवार यांनी रंगभूमीच्या पडत्या काळातही रंगमंच ...

‘फादर्स डे’ विशेष

मराठी रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक व अभिनेता अशी मुशाफिरी करणारे संतोष पवार यांनी रंगभूमीच्या पडत्या काळातही रंगमंच हलता ठेवण्याची किमया केली आहे. या हरहुन्नरी कलाकाराने मुख्यत्वे विनोदी अभिनेता म्हणून आपली छाप पाडत, रसिकांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलवण्याची मोठी कामगिरी बजावली आहे. दोन मुलींच्या आनंदात रममाण असलेल्या संतोष पवार यांनी ‘फादर्स डे’च्या निमित्ताने मांडलेली भूमिका...

खरेतर, ‘फादर्स डे’ नावाचा कुठला दिवस असतो, हे लहानपणापासून माहीतच नव्हते. माझे पप्पा पोलिसात होते; त्यामुळे मी पोलीस लाईनीत वाढलो. परिणामी, त्या वेळच्या मुलांच्या बाबतीत जे व्हायचे, तसेच माझेही होते. वडिलांचा प्रचंड धाक होता. साहजिकच, कोणताही फालतू हट्ट करण्याचे डेअरिंग तेव्हाही नव्हते आणि आताही नाही. हीच सवय माझ्या मुलांनाही आहे.

माझ्या पप्पांना माझ्या मुली ‘बाबा’ म्हणतात आणि मला ‘डॅडू’ म्हणतात. माझ्या वडिलांचा जसा मला धाक होता; तसाच माझ्या मुलींनाही माझा धाक आहे. माझ्या मुलींकडे पाहून मला माझे बालपण आठवते. पप्पांशी काही बोलायचीही मला भीती वाटायची. पैशांची किंमत आज मी ‘बाबा’ झाल्यावर मला कळली. पैसे कमवण्यासाठी किती मेहनत करावी लागते ते समजले. ‘तू जेव्हा बाबा होशील, तेव्हा तुला माझे म्हणणे कळेल,’ असे मला पप्पा कायम सांगायचे. त्याची प्रचिती मला मी बाबा झाल्यावर आली. माझी मोठी मुलगी ‘हास्या’ आणि लहान मुलगी ‘केया’ यांच्याशी माझी चांगली मैत्री आहे. जेव्हा हास्याचा जन्म झाला, तेव्हा मला अनेक जण म्हणाले की आता तू खऱ्या अर्थाने ‘हास्या’चा बाप झालास.

मुलांशी मैत्री असतानाच त्यांना थोडा धाकही असायला पाहिजे, असे मला वाटते. मैत्री अशासाठी असायला हवी की, त्यामुळे मन मोकळे करता येते. तब्येत बिघडली असेल, बरे वाटत नसेल तर या गोष्टी शेअर करण्यासाठी मुलांशी मैत्री असायला हवी. पण, मुलांनी खोटे बोलू नये, शाळेला दांडी मारू नये, अभ्यासाचा कंटाळा करू नये, नको ते हट्ट करू नयेत; अशा प्रकारच्या गोष्टींवर वचक राहण्यासाठी धाकही पाहिजे. आज मी बाबा झाल्यावर मला हे प्रकर्षाने जाणवते. उद्या माझी मुले पालक झाली की माझी भूमिका त्यांना नक्कीच कळेल आणि त्यांची मुलेही त्यांचे चांगले मित्र होतील.

‘फादर्स डे’साठी केया आता छान ग्रीटिंग वगैरे बनवते. माझ्या लहानपणी असे काही असते तर मीसुद्धा पप्पांशी अशा पद्धतीने बांधला गेलो असतो. पण, आता ‘फादर्स डे’ला मी माझ्या पप्पांशी फोनवरून बोलतो. सध्या कोरोनाचे वातावरण आहे म्हणून, नाहीतर या दिवशी आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे जाऊन आनंद साजरा करतो. कधी आम्ही शॉपिंगला गेलो की मुली त्यांना आवडलेल्या वस्तूंची आधी किंमत बघतात. आपल्या बाबांना ती वस्तू परवडणार आहे की नाही याचा विचार त्यांच्या मनात असतो. ती वस्तू घेऊन टाका, असे जरी मी त्यांना सांगितले तरी त्या तसे करीत नाहीत. शिवाजी मंदिरजवळ असलेल्या स्टॉल्सवर ही वस्तू जास्त स्वस्त मिळते, असे त्याच मला सांगतात. अशावेळी खूप बरे वाटते की त्यांना पैशांची किंमत कळलेली आहे. वडील आपले ‘मित्र’ आहेत म्हणून पैसे वाट्टेल तसे उडवायचे नाहीत, याची त्यांना जाण आहे. ‘फादर्स डे’ला उगाच पार्ट्या वगैरे करण्यापेक्षा मुलांना चार गोष्टी शिकवण्याचा मी प्रयत्न करत असतो. ज्या गोष्टी मला माझ्या पप्पांसोबत शेअर करायच्या राहून गेल्या, त्या मी मुलींसोबत शेअर करतो.

- संतोष पवार (लेखक, दिग्दर्शक व अभिनेता)

(शब्दांकन : राज चिंचणकर)

.........................................