मुंबई : ताउते चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून मुंबईत रविवारी पूर्णत: ढगाळ वातावरण नोंदविण्यात आले. रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत मुंबईवर पावसाचे ढग जमा झाले होते. मात्र, पावसाचा काही पत्ता नव्हता. सकाळी किंचित, संध्याकाळी किंचित रात्री काहीशा वाऱ्याच्या वेगाने पावसाने मुंबईत हजेरी लावली होती.
दिवसभर मुंबईत चक्रीवादळाचा प्रभाव ढगाळ हवामानाच्या रूपाने झाल्याने दिवसाच रात्र झाल्याचे निदर्शनास येत होते. सायंकाळी ५ नंतर मुंबईत बहुतांश ठिकाणी वेगाने वारे वाहत होते, शिवाय काही ठिकाणी रात्री उशिरा वेगाने पावसाच्या सरी कोसळत होत्या. विशेषत: पावसाच्या तुलनेत वाऱ्याचा वेग अधिक असल्याचे चित्र सकाळ, संध्याकाळच्या तुलनेत रात्री होते. दरम्यान, कोकण किनाऱ्यावर चक्रीवादळाचा प्रभाव आता वेगाने होत असून, सोमवारी चक्रीवादळ मुंबई लगतच्या समुद्राहून गुजरातकडे जाणार आहे. या काळात मुंबईचा समुद्र आणखी खवळलेला राहील. मोठ्या लाटा उसळतील. विशेषत: जोरदार पाऊस येईल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.