मुंबई : रविवारी सकाळी अंधेरी एमआयडीसी परिसरातील एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला या परिसरात बिबट्या निदर्शनास आला. याची माहिती संबंधिताने पोलिसांना दिली. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले.
उद्यान प्राधिकरणाने घटनास्थळी बिबटयाला ताब्यात घेण्यासाठी ३ पिंजरे बसविले. दहा ते बारा कॅमेरे बसविले. सोमवारी पहाटे बिबट्या या पिंजऱ्यात अडकला. यानंतर बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले.
वैद्यकीय तपासणीत तो फिट असल्याचे दिसून आल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक ठाणे हजर होते, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन अधिकारी विजय बारब्दे यांनी दिली.
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात बिबट्या निदर्शनास येण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. विशेषत: अंधेरी, गोरेगाव, बोरीवलीसह भांडूप आणि मुलुंड येथे बिबट्या निदर्शनास येतो.