Join us

...आणि लाइफलाइन थांबली

By admin | Published: September 12, 2015 5:11 AM

संध्याकाळी नेहमीप्रमाणे काम आटोपून घरी परतण्याची झालेली घाई, त्यासाठी लोकल पकडण्याची होणारी धडपड, लोकलच्या डब्यात मित्र-मैत्रिणी तसेच सहकाऱ्यांसोबत रंगलेल्या

संध्याकाळी नेहमीप्रमाणे काम आटोपून घरी परतण्याची झालेली घाई, त्यासाठी लोकल पकडण्याची होणारी धडपड, लोकलच्या डब्यात मित्र-मैत्रिणी तसेच सहकाऱ्यांसोबत रंगलेल्या गप्पा आणि त्याचवेळी अवघ्या ११ मिनिटांत झालेल्या सात बॉम्बस्फोटांमुळे थांबलेली लाइफलाइन... ११ जुलै २00६ रोजी ६.२३ ते ६.३४ या ११ मिनिटांत पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम जंक्शन, माटुंगा रोड, वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरीवली, मीरा रोड व भार्इंदर स्थानकांदरम्यान लोकलमध्ये स्फोट झाले आणि अवघी मुंबई थांबली. मुंबईकर यात कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ आणि बहीण तर कुणाचा नवरा तसेच मित्र या स्फोटात गमावून बसला. स्फोटातील खटल्याचा निकाल लागला असला तरी यात जखमी झालेले किंवा आपली जवळची व्यक्ती गमावून बसलेले अनेक जण ‘त्या’ झळा विसरलेले नाहीत. यातील काही जणांच्या ‘लोकमत’ने जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया‘तो’ चेहरा पुन्हा दिसलाच नाहीमी विक्रोळीत श्री असोसिएटमध्ये एलआयसी एजंट म्हणून काम करीत होतो. गोरेगावला राहत असल्याने नेहमीप्रमाणे संध्याकाळी ठरलेली ६.0८ ची जलद लोकल दादरमधून पकडली आणि फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करू लागलो. त्यावेळी लोकलच्या दरवाजाजवळ आतील बाजूला शांतपणे उभा राहून प्रवास करीत होतो. तर याच लोकलच्या डब्यातून नेहमीचेच चेहरे प्रवास करताना दिसत होते. यामध्येच ३0 ते ३५ वयोगटातील एक व्यक्तीही प्रवासात होती. नेहमी हसरा चेहरा आणि प्रसन्न व्यक्ती होती. प्रवास करीत असतानाच वान्द्रे ते खारदरम्यान आलेल्या या लोकलच्या डब्यात जबरदस्त स्फोट झाला आणि मी क्षणार्धात डब्यातच कोसळलो. थोड्या वेळाने डोळे उघडताच माझ्या डोक्यावर पंखा पडलेला होता. आजूबाजूला काही जखमी तर काही मृत झालेले प्रवासी होते. बचावासाठी आलेल्या लोकांनी मला भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेले. या स्फोटात माझ्या दोन्ही कानांचे पडदे फाटले आणि थोडे बहिरेपण आले. तसेच पत्र्याचे तुकडेही शरीरात घुसले. त्याच्या वेदना आजही होतात. ही घटना माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि दुखद घटना होती. या घटनेनंतर त्याच लोकलच्या आणि पुन्हा त्याच डब्यातून प्रवास करताना तो ३0 ते ३५ वयोगटातील चेहरा मात्र दिसलाच नाही. त्या व्यक्तीचे काय झाले आणि कुठे आहे ती व्यक्ती, याचा पत्ता लागलाच नाही. या खटल्याचा निकाल जो लागला आहे, त्याला फारच उशीर झालेला आहे. योग्य वेळी आणि योग्य निकाल लागणे गरजेचे होते. निकालावर समाधानी आहे एवढेच सांगेन.- सुहास तावडे, रहिवासी, गोरेगाव, वय ५८ वर्षेकठोर शिक्षा झालीच पाहिजे : अजूनही तो आवाज माझ्या कानात घुमतोय, असे मला वाटते. मी माहीम परिसरात असताना हा स्फोट झाला. माझ्या आजूबाजूला नुसते रक्त आणि माणसांचे अवयव विखुरलेले होते. स्फोट इतका भीषण होता, की माझ्या कानांचे पडदे फाटले. कानात गेलेले धातूंचे तुकडे काढण्यासा़ठी दोन वर्षे लागली आणि बहिरेपण आले. पण अजूनही ती घटना आठवली की झोप उडून जाते. स्फोटाला अनेक वर्षे झाली तरी त्या जखमा, लोकांचे आक्रोश अगदी ताजे असल्यासारखे वाटतात. इतक्या वर्षांनंतर निकाल लागला. परंतु १३ आरोपींपैकी १२ आरोपींनाच शिक्षा का, हा प्रश्न अजूनही आहे. गुन्ह्यात कोणत्याही प्रकारे सहभागी असलेला गुन्हेगारच असतो, तेव्हा प्रत्येकाला कठोर शिक्षा व्हायला हवी.-एल. के . पांडे, रहिवासी, भार्इंदर पूर्वफारच उशीर : सगळ््यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. अजून विलंब करू नये. न्याय मिळायला फारच उशीर झालेला आहे. त्यामुळे शिक्षा त्वरित सुनावून आम्हाला न्याय देण्यात यावा. -दशरथ पटेल, रहिवासी, भार्इंदरन्यायावर विश्वाससुप्रीम कोर्टाने स्थगिती आणल्यानंतर पुढे काय होईल याची प्रतीक्षा होती. परंतु पोलीस यंत्रणेवर, न्यायालयावर विश्वास होता आणि आहे. आरोपींना कठोर शिक्षा झाल्यावर खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. - डॉ. नरसिंह कामत, रहिवासी, माहीमनुकसान भरून निघणार नाहीमाझे पती चंद्रकात दळवी बॉम्बस्फोटातून बचावले. परंतु बॉम्बस्फोटानंतर त्यांना पॅरेलिसीसचा अ‍ॅटॅक आला आणि २००९ साली त्यांचे निधन झाले. बॉम्बस्फोटानंतर त्यांची वकिली बंद झाली. आम्हा दाम्पत्याला आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. माझे पती तर परत येऊ शकणार नाहीत आणि आरोपींना मिळणाऱ्या शिक्षेमुळे आमचे नुकसानही भरून निघणार नाही; पण तरीही समाधान आहे. -देवयानी दळवी, रहिवासी, दहिसरआर्थिक प्रश्न भेडसावतोयलोकलच्या स्फोटात मला डावा हात गमवावा लागला आणि त्यामुळे मला कृत्रिम हात बसवावा लागला. कृत्रिम हात बदलण्याची वेळ आली असून, त्यासाठी अडीच लाखांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी बरीच चिंताही लागली आहे. सध्या इंटिरिअर डिझाइन ते गणेशमूर्ती चितारण्याचे काम करावे लागत असून, आर्थिक प्रश्न भेडसावत आहेत. यातील दोषी बाराही आरोपींना फाशी द्यावी. या स्फोटांत प्राण गमावलेल्या अनेकांच्या आत्म्यास शांती लाभेल. तसेच हल्ल्यातून बचावलेल्या पण कायम अपंगत्व आलेल्या कित्येक कुटुंबांना दिलासा मिळेल. ‘देर आऐ दुरुस्त आऐ’, पण न्याय मिळाला याचे समाधान आहे.- महेंद्र पितळे, रहिवासी, मालाडआरोपींना मरेपर्यंत फाशी द्याबरीच वर्षे लढा देऊन अखेर आमचा मुलगा गेला याचे दु:ख अजूनही आहे. बॉम्बस्फोटामुळे एकाएकी आमचं हसतं कुटुंब उद्ध्वस्त झाले. आई म्हणून मुलाचं दु:ख पाहावे लागले याचे दु:ख मनाला कायम बोचत राहील. परागच्या बायको आणि मुलीने पती आणि बाबा गमवला, हे दु:ख कधीही भरून निघणारे नाही. पण एवढ्या वर्षांनी का असेना निकाल लागला याचे समाधान आहे. निरपराध लोकांना मारणाऱ्या या नराधमांना मरेपर्यंत फाशीच व्हायला हवी. या शिक्षेतून शिकून तरी असले कुकर्म करायला कोणी धजावणार नाही. - माधुरी सावंत,पराग सावंतची आई आजही थरकाप उडतोया बॉम्बस्फोटाची आठवण काढली की आजही थरकाप उडतो. मी त्यावेळी कांदिवलीला राहत असल्याने आणि दादर येथे माझे कार्यालय असल्याने दादर स्थानकातूनच संध्याकाळी ५.५४ ची विरार जलद लोकल पकडली. बोरीवलीला उतरून नेहमीप्रमाणे बस पकडून कांदिवलीला जात असे. त्यावेळी विरारच्या दिशेने असलेल्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करीत होतो. लोकल बोरीवली स्टेशनला येताच डब्यात स्फोट झाला आणि एकच अंधारी डोळ्यासमोर पसरली. डब्यातील उजव्या बाजूला असलेल्या दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करीत होतो. मी डब्यातच अगदी पुढच्या दरवाजाजवळ उभा होतो आणि स्फोट हा मागील तिसऱ्या दरवाजाजवळ झाला. स्फोटाची तीव्रता एवढी होती की प्रचंड धूर पसरला. भीतीपोटी मी डब्यातून उतरलो आणि प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडलो. मागे वळून काही बघण्याची इच्छाच होत नव्हती. घरी परतल्यानंतर टीव्ही सुरू करताच समजले की तो बॉम्बस्फोट होता. डोळ्यासमोर अंधारी पसरल्याने आणि भीतीपोटी आजूबाजूला काही न पाहिल्याने तो पेन्टोग्राफचा स्फोट असावा, असा अंदाज वर्तविला होता. पण तो बाम्बस्फोट असल्याचे समजताच थरकाप उडाला. या स्फोटामुळे माझ्या दोन्ही कानांना इजा पोहोचली आणि थोडे बहिरेपण आले. आज घटनेतील आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र न्याय मिळण्यास फारच उशीर झालेला आहे. - संतोष खानविलकर, रहिवासी, मुंबई सेन्ट्रल, वय ३३ वर्षे