Join us

...अन् काळजाचा ठोका चुकला; मुंबईकरांनी घेतला रोमांचक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 1:04 AM

चांद्रयान - नेहरू सेंटरमधली ती रात्र

मुंबई : वरळीतील नेहरू सायन्स सेंटरमध्ये चांद्रयान २ मोहिमेचे थेट प्रक्षेपण करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेकडो खगोलशास्त्रप्रेमींनी सभागृहात शुक्रवारी रात्री ११ वाजल्यापासूनच गर्दी केली होती. सर्व जण विक्रम लँडर चंद्रावर उतरेल याची आतुरतेने वाट पाहत होते. चांद्रयान मध्यरात्री १़५५ वाजता चंद्रावर उतरणार होते़ त्याआधी ११ ते ११़३० या वेळेत चांद्रयान मोहिमेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. विविध लघुपट दाखविण्यात आले. या वेळी सभागृहात एकच चर्चा होती ती विक्रम लँडरची.

हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी गर्दी केली. विक्रम लँडर जसजसे एक-एक टप्पा पार करीत होते, तसतशा टाळ्या आणि आणि जल्लोष होत होता. तर माध्यम प्रतिनिधींची प्रतिक्रिया घेण्यासाठी लगबग सुरू होती. लहान मुलेही विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरबाबत माहिती देत होती. चंद्राच्या साऊथ पोलवर विक्रम लँडर उतरेल ही ऐतिहासिक घटना असून त्यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल असे सांगण्यात येत होते. तर कमी खर्चातही भारत चांद्रयान मोहीम राबवितो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. या मोहिमेबद्दल जसजशी माहिती मिळत होती तसतसे आपण जिंकलो असे सर्वांना वाटत होते. अवघ्या दोन किमीचे अंतर बाकी असताना टाळ्यांचा कडकडाट झाला, पण अखेरच्या टप्प्यावर विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला अन् सभागृहात निरव शांतता पसरली. यानंतरही भारतीय वैज्ञानिकांनी जी मेहनत घेतली, कष्ट केले त्यामुळेच भारताची मोहीम ९८ टक्के यशस्वी झाली, अशा शब्दांत सर्वांनी वैज्ञानिकांचे कौतुक केले.

मी चांद्रयानची लँडिंग पाहायला आलो होतो. हा ऐतिहासिक क्षण आहे. ही मोहीम पूर्ण यशस्वी झाली नसली तरी भारतीय वैज्ञानिकांनी मोलाची कामगिरी केली आहे. भारतीय वैज्ञानिकांचा अभिमान आहे. - जनित खानोळकर

चांद्रयान मोहिमेसाठी संपूर्ण देश जागा होता़ खूप उत्सुकता होती या मोहिमेबद्दल़ एवढी रात्र होऊनही अनेक मुले या मोहिमेचे थेट प्रक्षेपण पाहायला आली होती. पण शेवटच्या वेळी काही अडचण आल्याने मोहीम पूर्ण झाली नाही त्याचे वाईट वाटते. - अन्वय शिंदे

टॅग्स :चांद्रयान-2