...अन् मॉरिसने स्वतःवर झाडली गोळी; सव्वा चार मिनिटांत असा रंगला हत्येचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 07:03 AM2024-02-10T07:03:46+5:302024-02-10T07:04:10+5:30
हत्येची ती सव्वाचार मिनिटे, असा रंगला हत्येचा थरार...
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना मॉरिस नरोन्हा याने कार्यक्रमासाठी गुरुवारी सायंकाळी आयसी कॉलनीमध्ये आमंत्रित केले होते. यावेळी दोघांनी परस्परांतील वाद मिटवून पुन्हा एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचा आनंद लुटल्यानंतर मॉरिसने फेसबुक लाइव्ह करण्याच्या निमित्ताने अभिषेक यांना कार्यालयात नेले. तिथेच त्याने अभिषेक यांना गोळ्या घातल्या.
मॉरिसने अभिषेक यांची फेसबुक लाइव्ह कार्यक्रमादरम्यान केलेल्या हत्येचा थरार उघड झाला आहे. अभिषेक यांच्यावर पाच गोळ्या झाडल्यानंतर घोसाळकर समोरची काच तोडून बाहेर कोसळले. मॉरिस दरवाजाकडे आला. घोसाळकर यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच मॉरिसने स्वतःच्या डोक्यात गोळी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात गोळी नसल्याने तो पहिल्या मजल्यावर गेला. तेथे पुन्हा बंदूक लोड करून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. अवघ्या सव्वाचार मिनिटांत हा सर्व थरार घडल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. पोलिसांनी रात्री उशिराने मॉरिसविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला.
थराराचा क्रम असा...
फेसबुक लाइव्हदरम्यान घोसाळकर आणि मॉरिस दोघेच कार्यालयात होते. मॉरिसने ट्रायपॉड लावून फेसबुक लाइव्ह सुरू केले. त्यानंतर दोन ते तीनदा उठून कॅमेऱ्याच्या बाजूला झाला.
चार मिनिटांनंतर बंदुकीने पाच गोळ्या घोसाळकर यांच्या दिशेने झाडल्या. यापैकी चार गोळ्या त्यांना लागल्या.
गोळ्यांच्या आवाजाने नागरिकांची पळापळ झाली. घोसाळकर यांनी जीव वाचविण्यासाठी काच तोडून कोसळले.
गोळीबारानंतर मॉरिसने दरवाजाकडे धाव घेतली. बाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये मॉरिस दोन ते तीन सेकंद घोसाळकराना पाहतो. हातातील बंदुकीने मॉरिस स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बंदुकीतील गोळ्या संपल्याने तो पोटमाळ्यावर धावला.
दाखल गुन्ह्याचा वाद
मॉरिस विरुद्ध बलात्कार, विनयभंग, तसेच जबरी चोरी अशा स्वरूपाचे तीन गुन्हे नोंद होते. बलात्काराच्या गुन्ह्यात त्याला अटकही झाली. तीन महिने कारागृहातही काढली. त्यानंतर एका प्रकरणात अभिषेकच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्याचा राग त्याच्या मनात होता. याच रागातून त्याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.