Join us

... अन् मोठा भाऊ छोटा झाला, भाजपाने शिवसेनेला 'इतिहास' दाखवला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 6:32 PM

जनसंघातून उदयास आलेल्या, हिंदुत्ववादी विचारसरणीवर आधारित असलेल्या भाजपाची स्थापना 6 एप्रिल 1980 साली झाली.

मुंबई - शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेना हा मोठा पक्षा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महारांजांच्या जयघोषाने शिवसेनेनं गेल्या अर्ध शतकापेक्षा अधिक काळापासून राज्यात आपला ठसा उमटवला. 80 % समाजकारण 20 % राजकारण या बाळासाहेब ठाकरेंनी ठरवलेल्या तत्वावर शिवसेना काम करते, असे शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर, नेहमीच आपल्या ठाकरेशैलीत भाजपला कमळाबाई म्हणून किंवा लहान भाऊ म्हणून बाळासाहेबांनी शिवसेनेचं स्थान पहिलं असल्याचं अधोरेखीत केलं. मात्र, बाळासाहेबांनंतर शिवसेना मोठ्या भावाचा सन्मान गमावून बसल्याचं दिसून येतंय. 

जनसंघातून उदयास आलेल्या, हिंदुत्ववादी विचारसरणीवर आधारित असलेल्या भाजपाची स्थापना 6 एप्रिल 1980 साली झाली. त्यामुळे स्थापनेनुसार शिवसेना हा भाजपासाठी मोठा भाऊ राहिला. मात्र, सध्याची राजकीय स्थिती पाहता, भाजपा हाच मोठा भाऊ झाल्याचं दिसून येतंय. सन 1972 साली वामनराव महाडिक यांनी शिवसेनेच्या तिकिटावर परेल मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर, 1990 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे 52 उमेदवार विजयी झाले. त्यावेळी, भाजपाला 42 जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर 1995 साली शिवसेना 73 तर भाजपा 65 जागांवर विजयी झाली. सन 1999 मध्ये शिवसेनेनं 69 जागांवर विजय मिळवला, तर भाजपाने 56 जागा जिंकत अपक्षांच्या मदतीने सेना-भाजपा युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं. सन 2004 च्या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेनं 62 जागा जिंकून मोठा भाऊ होण्याचा मान कायम ठेवला. तर भाजपाला 54 जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी भाजपा-सेनेला सत्तेतून बाहेर पडावे लागले. मात्र, शिवसेना-भाजपाची युती कायम राहिली. 

सन 2009 च्या निवडणुकीत भाजपाने 46 जागा जिंकल्या, तर शिवसेनेला 44 जागांवरच विजय मिळाला. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेनं भाजपापेक्षा कमी जागा जिंकल्या. मात्र, बाळासाहेबांचा दरारा, नेतृत्व अन् शब्द यामुळे भाजपा स्वत:ला लहान भाऊच मानत होता. मात्र, सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती तुटली. बाळासाहेबांच्या निधनानंतर पहिल्यांदाच भाजपाने शिवसेनेला आव्हान दिलं. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील विजयाचा फायदा भाजपला मिळाला. त्यामुळे भाजपाने 122 जागांवर विजय मिळवत आपणच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले. तर, शिवसेनेला केवळ 63 जागा जिंकता आल्या. निकालानंतर शिवसेनेनं पुन्हा भाजपासोबत हातमिळवणी केल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचं सरकार स्थापन झालं. पण, मुख्यमंत्रीपद भाजपाच्या पारड्यात पडलं. तेव्हापासून शिवसेना केवळ भाषणांपूरतीच मोठा भाऊ राहिली, पण अधिकार अन् जबाबदारीने भाजपाने मोठ्या भावाचा ताबा मिळवल्याचे अनेकदा दिसून आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी उद्धव ठाकरेंना मेरे छोटे भाई असे म्हणत भाजपा हाच मोठा भाऊ असल्याचा संदेश आपल्या भाषणातून महाराष्ट्राला दिला. विशेष म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरेही मंचावर उपस्थित होते.  

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेभाजपाविधानसभा निवडणूक 2019राजकारण