खाकीतील पुंडलिक आव्हाड यांनी वाचवला चिमुरडीचा जीव; आतापर्यंत ६१ वेळा केले रक्तदान
कोरोना काळात ४ जणांचा वाचवला जीव
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलीच्या उपचारादरम्यान रुग्णालयात धावपळ सुरू असताना, दक्षिण भारतातील एक कुटुंब त्यांच्या ६ वर्षांच्या चिमुकलीच्या ओपन हार्ट शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या रक्ताच्या शोधात वणवण फिरत असताना नजरेस पडले. त्यांची ही अवस्था पाहून नुकतेच रक्तदान केले असतानाही, त्या चिमुकलीसाठी पाेलिसाने रक्तदान केले आणि त्या चिमुकलीचा जीव वाचला. तब्बल १९ वर्षांनी हे कुटुंब त्यांना शाेधत पोलीस ठाण्यात पोहोचले. ते मुलीच्या लग्नाचे आमंत्रण घेऊन. कुठेतरी आमच्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या नात्यामुळे ते कुटुंबीय मला आजही विसरले नसल्याचे शिवडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार पुंडलिक आव्हाड सांगतात. त्यांनी गेल्या २५ वर्षांत ६१ वेळा रक्तदान केले आहे.
मूळचे अहमदनगरच्या चिंचपूर पांगुळ गावचे रहिवासी असलेले पुंडलिक आव्हाड हे १९९६ मध्ये मुंबई पोलीस दलात भरती झाले. गुन्हे शाखा, विशेष शाखा, मोटार परिवहन विभागात त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर २०१५ पासून ते शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. आव्हाड यांनी आतापर्यंत ६१ वेळा रक्तदान केले आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी ४ वेळा रक्तदानाचा हक्क बजावून चार जणांचा जीव वाचवला.
आव्हाड सांगतात, २००२ मध्ये मुलीच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी आधी रक्तासाठी वणवण सुरू होती. तिच्यासाठी कसेबसे रक्त जमा केले. मुलीसाठी केईएम रुग्णालयात धावपळ सुरू असताना, एक दक्षिण भारतातील कुटुंब त्यांच्या ६ वर्षांच्या मुलीसाठी रडताना नजरेस पडले. रक्ताअभावी त्यांच्या मुलीची ओपन हार्ट सर्जरी थांबली होती. त्यांची ही अवस्था बघवली नाही. त्यामुळे डॉक्टरांची भेट घेत त्या मुलीसाठी रक्तदान केले.
मुळात आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच रक्तदान केले होते. दोन रक्तदानात किमान ३ महिन्यांचे अंतर राहणे गरजेचे असते; मात्र त्या पालकांची तळमळ पाहून त्यांनी याची वाच्यता न करता त्या चिमुकलीसाठी रक्तदान केले. त्यांच्या रक्तदानामुळे मुलीचा जीव वाचला. तेव्हापासून त्यांनी रक्तदान करण्याचा निश्चय घेतला आणि आतापर्यंत न चुकता त्यांचे हे रक्तदानाचे कार्य सुरू आहे. गेल्या २५ वर्षांत त्यांनी ६१ वेळा रक्तदान केले आहे.
रक्तदान करतानाचे बरेच अनुभव असतात; मात्र १९ वर्षांपूर्वी रक्तदान केल्याने प्राण वाचलेल्या त्या मुलीचे आई-वडील मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यांनी मुलीच्या लग्नाची पत्रिका हातात देत, तुमच्यामुळेच आज हा क्षण आमच्या नशिबी आल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्याला गहिवरून आल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
जोपर्यंत मी रक्तदान करण्यासाठी सक्षम आहे तोपर्यंत मला रक्तदान करायचे आहे. माझ्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो, या माणुसकीच्या आणि सामाजिक भावनेतून मी रक्तदान करत राहणार आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रक्ताची कमतरता लक्षात घेता, रक्तदानासारखे श्रेष्ठ दान करणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.
* स्वतःसह संपूर्ण गावाला ओढले रक्तदानाच्या कार्यात
आव्हाड यांनी रक्तदानाचे महत्त्व गावातल्या मंडळींनाही पटवून दिले. गावात रक्तदान शिबीर आयाेजित करण्यास सुरुवात केली. वर्षाला १०० ते १५० जण यात रक्तदान करत आहेत. हे जमा झालेले रक्त रुग्णालयांना देण्यात येते.
* पोलीस महासंचालक पदकाने सन्मान
पुंडलिक आव्हाड यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यावर्षी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
------------------------