...आणि पोलिसांनी दिले आजीला ‘बर्थडे’ गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 01:51 AM2019-01-08T01:51:29+5:302019-01-08T01:52:21+5:30
ज्युलियाना परेरा (७०) असे या आजींचे नाव आहे. त्या चारकोपमध्ये राहतात, मात्र त्यांच्या घराची डागडुजी सुरू असल्याने काही दिवसांपासून त्यांच्या मुलीकडे गोरेगावमध्ये राहायला आल्या होत्या.
मुंबई : लाखोंचा ऐवज असलेली बॅग ७० वर्षांच्या आजी रिक्षामध्ये विसरल्या. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली. मात्र, चारकोप पोलिसांनी कोणताही ठोस पुरावा नसताना, तपास करत आजींच्या वाढदिवसाच्या दिवशीच बॅग शोधून काढली आणि त्यांना खरे बर्थडे गिफ्ट दिले.
ज्युलियाना परेरा (७०) असे या आजींचे नाव आहे. त्या चारकोपमध्ये राहतात, मात्र त्यांच्या घराची डागडुजी सुरू असल्याने काही दिवसांपासून त्यांच्या मुलीकडे गोरेगावमध्ये राहायला आल्या होत्या. येताना त्यांनी त्यांचा दागिन्यांचा डबादेखील सोबत आणला. त्यात ६ लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने होते. विक्रोळीत मुलीच्या नात्यातील एक लग्न सोहळ्याला जाऊन आल्यानंतर त्या घरी निघाल्या. निघताना सोबत त्यांनी दागिन्यांचा डबादेखील घेतला. त्यांचे जावई स्टॅनी जठाना हे आणि त्यांची नात त्यांना चारकोपच्या घरी सोडायला गेले. रिक्षातून उतरल्यानंतरच बॅग विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. जावई स्टॅनी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारीला हा प्रकार घडल्यानंतर आम्ही या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र आयुष्यभराची मिळकत अशी गमावल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली आणि त्या रडू लागल्या. मात्र चारकोप पोलीस ठाण्याचे प्रमुख प्रमोद ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश चव्हाण, सावंत, धोत्रे आणि निकम यांनी त्यांची समजूत काढली. त्यातच दुसऱ्या दिवशी परेरा आजींचा वाढदिवस होता हेदेखील पोलिसांना समजले. पोलिसांच्या पथकाने चौकशी करत सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षाचा माग काढला.
शोधमोहिमेला यश
च्बराच वेळ शोधल्यानंतर त्यांना पळायच्या तयारीत असलेला हरीश चंद्र हा रिक्षाचालक सापडला. चौकशीत सुरुवातीला त्याने सहकार्य केले नाही. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर बॅगेत दागिने असून ते सोन्याचे आहेत याची तो खात्री करून आल्याची कबुली दिली.