...आणि पोलीस आईसह बाळानेही सोडले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:10 AM2021-02-06T04:10:12+5:302021-02-06T04:10:12+5:30
मुंबई : घरात नवीन पाहुणा येणार असल्याने कुटुंबीय आनंदात होते. दोघांच्या स्वागताची तयारीही सुरू झाली. मात्र त्यापूर्वीच आईसह ...
मुंबई : घरात नवीन पाहुणा येणार असल्याने कुटुंबीय आनंदात होते. दोघांच्या स्वागताची तयारीही सुरू झाली. मात्र त्यापूर्वीच आईसह बाळानेही प्राण सोडले. पनवेलच्या पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबई पोलीस दलातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईच्या पायधुनी पोलीस ठाण्यातील सीसीटीएनएस विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या अक्षता पाटील (२७) पनवेल परिसरात कुटुंबीयांसोबत राहण्यास होत्या. कर्तव्यदक्ष तसेच मनमिळावू स्वभावामुळे त्या सर्वांच्याच जवळ होत्या. २०१८ पासून पायधुनी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. यापूर्वी त्या सशस्त्र पोलीस दलात कार्यरत होत्या. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे गर्भवती महिला पोलिसांना घरी राहण्याची मुभा मिळाली. त्या गावी पेणला गेल्या. गुरुवारी प्रसूती कळा सुरू झाल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे ठीक न वाटल्याने त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रसूती दरम्यान झालेल्या अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. हा धक्का सहन होत नाही तोच जन्माला आलेल्या बाळाचाही मृत्यू झाला. या घटनेने पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष दूधगावकर यांनी दिली.