मुंबई : शेतकऱ्यांच्या मोर्चाने सोमवारी मुंबई दणाणली. आझाद मैदान येथील जाहीर सभेनंतर आंदोलकांनी राजभवनाच्या दिशेने मोर्चा वळवला. पोलिसांनी मेट्रो सिनेमाजवळ आंदोलकांना अडवले. तेथून संयुक्त शेतकरी मोर्चाचे २३ प्रतिनिधी मागण्यांचे निवेदन देण्यासाठी राजभवनावर जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी पोलीस बंदाेबस्तासह सज्ज हाेते. मात्र, राज्यपाल राजभवनात नाहीत तर ते गोव्याला गेले आहेत. त्यामुळे त्यांना निवेदन द्यायचे नाही, असा निर्णय उपस्थित नेत्यांनी तिथेच चर्चेअंती घेतला.
नाशिक येथून सुरू झालेला अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा सोमवारी मुंबईत दाखल झाला. या मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यातून हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. तरुण, महिला व ज्येष्ठांचाही सहभाग हाेता. हे शेतकरी कसारा घाटमार्गे व नवी मुंबई येथून पायी चालत मुंबईत दाखल झाले. त्यांच्या सोबत ट्रॅक्टर, टेम्पो, जीप इत्यादी वाहने होती. मुंबईत दाखल झाल्यानंतर अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळ, गुरुद्वारामधून मदतीचा हात पुढे करण्यात आला. आझाद मैदानात मोर्चा दाखल झाल्यानंतर अनेकांनी रात्रभर तेथे वास्तव्य केले. काही संस्थांनी शेतकऱ्यांना ब्लँकेट व शाल वाटप केले. काहींनी शेतकऱ्यांनी सोबत आणलेली लाकडे एकत्र करून शेकोटी पेटवली. सकाळ होताच सोबत आणलेली चटणी, भाकर खाऊन मोर्चाची तयारी केली.
मोर्चात सहभागी आदिवासी शेतकऱ्यांनी वाद्यांच्या तालावर पारंपरिक नृत्य सादर केले. तरुणांनी पथनाट्य, शाहिरी जलसा, विद्रोही गीतांमधून, रायगडातील कातकरी आदिवासी समाजातील शेतकऱ्यांनी पारंपरिक फेऱ्यांच्या गाण्यांमधून केंद्राचा निषेध केला. मैदान व परिसरातील कचरा शेतकऱ्यांनी उचलला. त्यानंतर माेर्चा साेमवारी राजभवनच्या दिशेने रवाना झाला.
निवेदनाच्या प्रती फाडण्याचा प्रयत्न किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे म्हणाले की, राज्यपालांनी स्वतः भेटीची वेळ दिली होती; पण आंदोलकांना वाटाण्याच्या अक्षता लावून राज्यपाल गोव्याला निघून गेले. राज्यपाल आधी भाजपचे मुख्यमंत्री होते; त्यामुळे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करता येणार नाही. राज्यपालांचे सचिव किंवा एडीसींना आम्ही निवेदन देणार नाही. राज्यपालांचा निषेध करत या निवेदनाच्या प्रती फाडण्याचा निर्णय झाला आहे.
आझाद मैदानात आज ध्वजवंदन... प्रजासत्ताक दिनी आझाद मैदानात ध्वजवंदन केले जाईल. राज्यभर भाजपविरोधात आणि कृषी कायद्यांविरोधात प्रचार केला जाईल, असेही ढवळे म्हणाले. राज्यभरातून शेतकरी किसान सभेच्या मोर्चात महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यातून हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. नवीन कायदे मागे घेण्यात यावेत, यावर आम्ही ठाम असून मागे हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी दिला आंदोलनाला पाठिंबामुंबईत झालेल्या शेतकरी आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: सहभागी होणार होते. मात्र घटनात्मक पदावर असल्याने त्यांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी न होता, या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, असे एका शिवसेना नेत्याने सांगितले. मात्र शिवसेनेचे नेतेही या आंदोलनाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलन याबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय, अशी चर्चा आंदोलनस्थळी होती.
वाद, संताप आणि निराशा; परिसराला छावणीचे स्वरूप
आझाद मैदान येथून राजभवनाच्या दिशेने निघालेल्या किसान मोर्चाला मेट्रो सिनेमाकडे पोलिसांनी अडविल्यामुळे वाद झाला. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन केले. त्यात राज्यपाल नसल्याचे समजताच संतापात भर पडली. यावेळी परिसराला छावणीचे स्वरूप आले हाेते.
सोमवारी दुपारी शेतकरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी राजभवनाकडे निघाले. यावेळी ड्रोनद्वारे सर्व घडामोडींवर पोलीस लक्ष ठेवून होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर १०० अधिकारी, ५०० अंमलदारांचा अतिरिक्त फाैजफाटा तसेच एसआरपीएफच्या ९ तुकड्या तैनात होत्या. साध्या गणवेशातील पोलीसही मोर्चात सहभागी होऊन सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. मोर्चा मेट्रो सिनेमाकडे धडकताच पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांना अडविले. तरीही काहींनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना यावेळी सौम्य बळाचाही वापर करावा लागला. सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे अनुचित प्रकार यावेळी घडला नाही.