राज ठाकरे आले असं वाटल्यानं कुटुंबीय ईडीच्या गेटकडे धावले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 06:03 AM2019-08-23T06:03:57+5:302019-08-23T09:05:09+5:30

गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून बंदोबस्तात वाढ करण्यात आली. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे हे ईडीच्या कार्यालयाबाहेर १३०० ते १५०० लोकांसह विरोध दर्शविण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, सकाळीच शिवाजी पार्क पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

... and Raj Thackeray appeared in ED's office | राज ठाकरे आले असं वाटल्यानं कुटुंबीय ईडीच्या गेटकडे धावले, पण...

राज ठाकरे आले असं वाटल्यानं कुटुंबीय ईडीच्या गेटकडे धावले, पण...

Next

मुंबई : मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्रीपासूनच मनसेचा दबदबा असलेल्या शहरातील विविध भागांसह बेलार्ड पीअर भागातील सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) विभागीय कार्यालय तसेच शहरात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यात ईडीच्या कार्यालयाबाहेर असलेल्या जास्तीच्या फौजफाट्यामुळे कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते.

गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून बंदोबस्तात वाढ करण्यात आली. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे हे ईडीच्या कार्यालयाबाहेर १३०० ते १५०० लोकांसह विरोध दर्शविण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, सकाळीच शिवाजी पार्क पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मुंबईत गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेशही लागू केल्याची माहिती पोलिसांकडून कार्यकर्त्यांना देण्याचे काम सुरू होते. मनसे पदाधिकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून होते.

दादरच्या कृष्णकुंजमधून गुरुवारी साडेदहाच्या ठोक्याला ठाकरे हे पत्नी शर्मिला, मुलगा अमित, मुलगी उर्वशी, सून मितालीसोबत ईडीच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाले. या वेळी त्यांच्या मातोश्रींनी त्यांचा हात पकडला. त्या भावुक झाल्या होत्या. आईचा आशीर्वाद घेत, प्रसारमाध्यमांना हात दाखवत ठाकरे यांचा ताफा विशेष बंदोबस्तात ईडीच्या कार्यालयाबाहेर धडकला. त्यांना पाहण्यासाठी जवळच्या कार्यालयातील कर्मचारी हे आडोसा घेऊन उभे होते. राज येताच त्यांचीही पुढे जाण्यासाठी लगबग सुरू झाली. ठाकरे कुटुंबीयांना बॅरिकेड्सबाहेरच थांबवण्यात आले.

सकाळी ११.२० च्या सुमारास राज यांनी ईडीच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर पोलिसांनी ईडीचे कार्यालय बंद करून घेतले. या वेळी पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार स्वत: सर्व घटनांवर लक्ष ठेवून होते. कार्यालयासमोरच माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी लक्ष्मणरेषा आखण्यात आली होती. राज ठाकरे आत गेल्यानंतर काही वेळातच ठाकरे कुटुंबीयांनी शेजारील ग्रॅण्ड हॉटेल गाठून तेथेच ठाण मांडले.
तासाभराने कुटुंबीय खाली उतरले. चौकशीचे तास जसजसे वाढत होते, तसतशी कुटुंबीयांची चिंताही वाढताना दिसली.

तब्बल नऊ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर रात्री ९ वाजता राज ठाकरे आपल्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा, ‘कितीही चौकशा केल्या, तरी तोंड बंद ठेवणार नाही, अशी पहिली प्रतिक्रिया राज यांनी दिली.

...प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह कुटुंबीयही पळाले

दुपारी सव्वादोनच्या सुमारास ठाकरे कुटुंबीय झाडाखाली एकत्रित जमले. ते पाहून माध्यमांचे प्रतिनिधीही तेथे धडकले. ठाकरे कुटुंबीयांच्या गप्पा सुरू असतानाच, अचानक राज ठाकरे बाहेर आल्याची कुजबुज झाली आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमागे पोलीस आणि पोलिसांमागे ठाकरे कुटुंबीय पळतच कार्यालयासमोर गेले. मात्र, राज ठाकरेंऐवजी ईडीचा कर्मचारी खाली उतरला.

क्षणभर कोण कशासाठी पळाले हे कळलेच नाही. शर्मिला यांनी पोलिसांकडे याबाबत चौकशी केली. मात्र, संबंधित पोलिसानेही माध्यमांचे प्रतिनिधी पळाले म्हणून आम्ही पळाल्याचे सांगितले.

त्यानंतर ठाकरे कुटुंबीय पुन्हा मागे फिरले. मात्र त्यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडेच खिळून होत्या. या प्रकारामुळे परिसरात काही काळ हशा पिकला होता.

ठाणे जिल्ह्यातून मनसेचे २०२ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

ठाणे : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चौकशीसाठी पाचारण केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह आयुक्तालय क्षेत्रातून २०२ जणांना ठाणे पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. तर, दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयालाही राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांचे संरक्षण दिले असून २०४ जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत.

ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र - सुप्रिया सुळे

ठाणे : ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र आहे. जो कोणी आवाज उठवतो, त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे. अशा संकटावेळी परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे राज ठाकरे यांचे कुटुंब जर राज ठाकरेंसोबत गेले, तर कोणी टीका करू नये, असे सांगून खा. सुप्रिया सुळेंनी अंजली दमानियांच्या टीकेला नाव न घेता प्रत्युत्तर दिले. बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत आहेत, यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली, असेही त्या म्हणाल्या.

असेच इंदिरा गांधी यांच्या बाबतीतही घडले होते - जितेंद्र आव्हाड
राज ठाकरे आणि पी. चिदम्बरम यांची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र आहे. असेच इंदिरा गांधी यांच्याबाबतही घडले होते. त्यांना जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांना न मानणारे लोकही त्यांच्यामागे उभे होते. अशा परिस्थितीत कुटुंबच मागे उभा राहतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर कोणी टीका करू नये. ईडी म्हणजे सरकारचा राजकीय स्टंट आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व सुरू आहे. ईडीच्या दबावतंत्रामुळे सर्व नेते सेना-बीजेपीमध्ये जात आहेत, अशी टीका राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

राज यांना विचारण्यात आलेले प्रश्न
- मातोश्री कन्स्ट्रक्शनचे भागभांडवल, भागीदार कोण कोण आहेत?
- कोहिनूर समूह ग्रूपमध्ये किती गुंतवणूक केली होती?
- भागीदारीचा हिस्सा किती होता?
- अन्य कोण कोण भागीदार होते, त्यांचा हिस्सा किती होता?
- कंपनीतील भागीदारी सोडण्याचे कारण काय?
- भागीदारीचे समभाग किती रकमेत विकले?
- या व्यवहारात आर्थिक फायदा की नुकसान झाले?
- कोहिनूर प्रकल्प तोट्यात जाण्याचे कारण काय?

राज यांनी दिलेली उत्तरे
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज यांनी काही प्रश्नांवर आपल्याला यासंबंधी काही माहिती नाही, कागदपत्रे पडताळून तपशील देण्याची हमी दिली. राज यांच्याकडे सायंकाळी नऊ वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. मात्र चौकशी पूर्ण न झाल्याने त्यांना पुन्हा कागदपत्रांसह पाचारण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

राज यांना घरचा डबा
ईडी कार्यालयात चौकशी सुरू असताना दुपारी सव्वाबाराच्या सुमारास राज यांना घरून जेवणाचा डबा आणण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास जेवणासाठी थोडा वेळ चौकशी थांबविली होती. त्या वेळी राज यांनी त्यातील थोडेसे पदार्थ खाल्ल्याचे समजते.
चौकशीवेळी अस्वस्थता
ईडी कार्यालयात चौकशीदरम्यान राज ठाकरे अनेकदा अस्वस्थ झाले होते. अधिकाºयांनी केलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी नकारार्थी उत्तरे दिल्याचे समजते. राज यांना धूम्रपानाची सवय आहे. मात्र चौकशीच्या कालावधीत त्यांना त्यापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते, असे एका अधिकाºयाने सांगितले.

प्रकरण काय, चौकशी कोणाची?
दादर (प.) शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या जागेत उभारल्या जाणाºया कोहिनूर स्केअर टॉवर या सुमारे २,१०० कोटींच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे कंपनीच्या थकीत कर्जाच्या अनुषंगाने कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी व अन्य भागीदार राजन शिरोडकर यांची गेले तीन दिवस चौकशी झाली. जोशी यांना २४ तास तर शिरोडकर यांना १३ तास ईडीच्या कार्यालयात घालवावे लागले. सोमवारी, २६ आॅगस्टला त्यांना पुन्हा चौकशीस बोलावले आहे.

Web Title: ... and Raj Thackeray appeared in ED's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.