Join us

...आणि खरा चोर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:07 AM

बँक कर्मचाऱ्यांनी घेतला सुटकेचा निश्वास...आणि खरा चोर सापडलाविलेपार्लेतील बँक चाेरी; कर्मचाऱ्यांनी साेडला सुटकेचा नि:श्वासलोकमत न्यूज नेटवर्क...

बँक कर्मचाऱ्यांनी घेतला सुटकेचा निश्वास

...आणि खरा चोर सापडला

विलेपार्लेतील बँक चाेरी; कर्मचाऱ्यांनी साेडला सुटकेचा नि:श्वास

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बँकेतून २० लाखांची चोरी झाली. त्यात डीव्हीआरमधील सीसीटीव्ही फुटेजही डिलिट केले. चोर न सापडल्याने बँकेने दोन कर्मचाऱ्यांनाच जबाबदार ठरवून त्यांच्याकडून प्रत्येकी १० लाख रुपये घेतले. मात्र गुन्हा केला नसल्याने एकाने पोलिसांत धाव घेतली. अखेर, वर्षभराने गुन्ह्याचा उलगडा झाला आणि खरा चोर बिरेन वखारिया हा पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

विलेपार्लेच्या युको बँकेत २०१९ च्या अखेरीस डिसेंबरमध्ये ही चोरी झाली होती. बँकेला २० लाखांची तफावत आढळून येताच त्यांनी अंतर्गत चौकशी केली. त्यात चोर हाती न लागल्याने त्यांनी याची जबाबदारी असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत त्यांना पैसे भरण्यास भाग पाडले. त्यात सीसीटीव्ही फुटेज डिलिट केल्यामुळे त्यांच्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरावाही नव्हता. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. पुढे पोलिसांच्या सांगण्यावरून बँकेने तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवत पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी डिलिट केलेले फुटेज मिळविले. त्यात एक तरुण चोरी करताना कैद झाला हाेता. त्याच फुटेजच्या आधारे पथकाने आरोपीचा शोध घेतला. तो एका खासगी कंपनीत काम करत असल्याचे समाेर आले. त्याला बोरीवली येथून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

....................