Join us

...आणि विमानतळावर बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू, तातडीने मिळाले प्राथमिक उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 10:04 AM

Mumbai Airport: विमानाच्या प्रतीक्षेत मुंबई विमानतळाच्या गेट क्रमांक ४९वर बसलेल्या एका ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र, विमानतळावर कार्यरत वैद्यकीय यंत्रणेने तातडीने प्राथमिक उपचार दिल्यामुळे संबंधित प्रवाशाचा जीव वाचला.

मुंबई : विमानाच्या प्रतीक्षेत मुंबईविमानतळाच्या गेट क्रमांक ४९वर बसलेल्या एका ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र, विमानतळावर कार्यरत वैद्यकीय यंत्रणेने तातडीने प्राथमिक उपचार दिल्यामुळे संबंधित प्रवाशाचा जीव वाचला. 

इंडिगोच्या ६ ई-६०९२ या विमानाने प्रवासास निघालेले ६३ वर्षीय केशव कुमार हे त्यांच्या विमानाची प्रतीक्षा करत गेट क्रमांक ४९ जवळ बसला होते. तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काही मिनिटांतच ते कार्पेटवर कोसळले आणि बेशुद्ध झाले. ही घटना इंडिगो विमानाच्या काउंटवर असलेल्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने विमानतळ प्रशासनाला सूचित केले आणि त्यावेळी विमानतळाच्या वैद्यकीय कक्षात कार्यरत असलेल्या डॉ. दानिश आणि त्यांच्या पथकाने तिथे धाव घेतली. तेव्हा केशव कुमार बेशुद्धावस्थेत असल्याचे त्यांना आढळून आले. या प्रवाशाचा श्वासही बंद झाला होता आणि त्यांची नसही डॉक्टरांना लागत नव्हती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सीपीआर (छातीवर हृदयापाशी दाब देण्याची वैद्यकीय पद्धत) दिला तसेच एईडी शॉक देण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हृदयाची हालचाल पुन्हा सुरू झाली. त्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

टॅग्स :मुंबईविमानतळ