...आणि मृत्यूच डोळ्यासमोर पाहिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 07:22 AM2018-06-29T07:22:16+5:302018-06-29T07:22:34+5:30
जेवणाची वेळ झाली म्हणून अन्य कामगार निघाले. आम्हीही हातातले काम उरकून जेवायला जाऊ असे ठरविले. काम सुरू असतानाच अचानक जोराचा आवाज झाला.
मनीषा म्हात्रे
मुंबई : जेवणाची वेळ झाली म्हणून अन्य कामगार निघाले. आम्हीही हातातले काम उरकून जेवायला जाऊ असे ठरविले. काम सुरू असतानाच अचानक जोराचा आवाज झाला. पाहता पाहता धुरांमध्ये घेरलो गेलो. क्षणभर इमारतच कोसळली... आणि आपण त्याखाली अडकलो... या भीतीने थरकाप उडाला. काही कळण्याच्या आतच लागोपाठ तीन ते चार स्फोट झाले. नजरेसमोर आलेल्या काळोखात मरण निश्चित म्हणून देवावर कुटुंबीयांची जबाबदारी सोपवून पळत सुटलो. पुढे काही अंतरावर आल्यावर अरे बच गये.. हे शब्द कानी पडले. मात्र अंगारवरचा शहारा कायम होता... जणू मृत्यूच डोळ्यांसमोर पाहिल्याचा थरारक अनुभव घटनास्थळी काम करत असलेल्या कामगार रामनरेश पासवान याने ‘लोकमत’ला सांगितला़
मूळचा बिहारचा असलेला पासवान वर्षभरापासून पांजरपोळ येथे सुरू असलेल्या बांधकामाधीन साईटवर सुतार म्हणून नोकरीला आहे. त्याच्यासह १५० कामगार येथे नोकरीला आहेत. बांधकामाधीन इमारतीच्या शेजारी उभारलेल्या संक्रमण शिबिरात ते राहतात. पासवान याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, सगळे कामगार जेवणासाठी बाहेर पडले. मी आणि माझे चार सहकारी येथीलच टाकीजवळ काम करीत होतो. थोडेच काम राहिल्याने ते उरकून निवांत जेवायला जाण्याचे आम्ही ठरविले. त्यानुसार, काम सुरू केले. कोण गाणे गुणगुणतेय.. तर कुठे गप्पांद्वारे काम उरकणे सुरू होते. अशातच कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने आम्ही हादरलो. इमारतच पडली. मर गये मर गये.. असा सूर, अंगाचा थरकाप. त्यात डोळ्यांसमोर धुरामुळे काळोख.
त्यातून वाट काढून मी पळत सुटलो. लागोपाट स्फोटांचे आवाज हृदयाचे ठोके वाढवत होते. तेव्हा विमान कोसळल्याचे कानावर पडले. जळत्या विमानाप्रमाणे आपणही खाक होणार... हे निश्चित होते असे वाटले. दोन मुले आणि पत्नी नजरेसमोर होती. देवावर कुटुंबीयांचा सांभाळ करण्याची जबाबदारी सोपवून मी धावत होतो.
जेव्हा थांबलो तेव्हा सारे काही थांबल्यासारखे वाटले. मी वाचलो, यावरही विश्वास बसत नव्हता, असे त्याने सांगितले. त्यानंतर मुलांनाच प्रेमाने कवटाळून घेतल्याचे पासवान याने सांगितले.
सामान घेऊन
घराबाहेर पळालो..
काम करून घरी जेवायला आलो. जेवण वाढणार तोच आवाज झाला. सिलिंडरचा स्फोट की इमारत कोसळली, या भीतीने अन्य कामगारांना भागो भागो.. करत घराबाहेर काढले. हातात सामान घेऊन आम्ही जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पडलो, असे कामगार मिथुन कुमार याने सांगितले. तो या परिसरात फिल्टरचे काम करत होता.
५ मिनिटांमुळे वाचले २५ जीव
जेवणाची वेळ १ ते २. नेहमीप्रमाणे आम्ही जेवायला निघालो. दुर्घटना घडली तेथे आम्ही २५ जण काम करीत होतो. जेवणासाठी बाहेर पडणार, तोच पाठून आवाज आला. अवघ्या ५ मिनिटांच्या फरकामुळे वाचल्याचे कामगार मोहम्मद रौनक याने सांगितले.
जबाब नोंदवण्याचे काम सुरू...
घाटकोपर पोलिसांनी विमान दुर्घटनेप्रकरणी साडेचारच्या सुमारास अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास
सुरू केला आहे. घटनास्थळावरील परिस्थिती तसेच प्रत्यक्षदर्शी, संबंधित अधिकारी यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार, अधिक तपास करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी सांगितले.
जखमींची प्रकृती स्थिर
सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदानाच्या प्रक्रियेनंतर हे मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत, त्यानंतर ते कुटुंबीयांकडे सोपविण्यात येतील. याशिवाय, रुग्णालयात जखमी असलेल्या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.
- डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय
१० सेकंदांच्या फरकाने बचावलो...
घरी जेवत असताना स्फोटाचा हादरा बसला. इमारतीला छेदून काही तरी गेल्याचा भास झाला. बाहेर बघितले तर बांधकामाधीन जागेवर विमान कोसळलेले दिसले. अवघ्या १० सेकंदांच्या फरकामुळे आम्ही वाचलो, अशी माहिती येथील श्री शंकर सागर इमारतीतील रहिवासी प्रकाश श्रीगिरी यांनी दिली. घटनास्थळाशेजारीच ही सात मजली इमारत आहे. या इमारतीत जवळपास १०० रहिवासी आहेत.बाजूला पटेल निवास आहे. यामध्ये सर्वांत जवळ शंकर निवास हीच इमारत होती. इमारतीवरूनच विमानाचा स्फोट होण्यास सुरुवात झाली. ते खाली कोसळले. नाहीतर, इमारतीचे काही मजले या अपघातात अडकले असते आणि मृतांचा आकडा जास्त असता. इमारत खाली करून सर्व रहिवासी बाहेर पडले. आम्ही स्थानिकांच्या मदतीला धावल्याचेही श्रीगिरी यांनी सांगितले.
नाहीतर... तो प्रवास अखेरचा ठरला असता !
येथीलच जीवदया इमारतीत राहणारे प्रवीण शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार,मी आणि भाचा नेहमीप्रमाणे जेवणासाठी कारने घराकडे निघालो. कार पास झाली तोच जोराचा धमाका झाला. मागे बघण्यापूर्वीच कार पटापट पुढे घेण्यास सांगितली. मागे वळून पाहिले तेव्हा, तेव्हा जळते झाड दिसले. आणि त्यामागे एक जळणारा पाय दिसला. काही कळण्याचा आत दुसरा धमाका झाला. त्या आवाजाने घाबरुन गेलो. अंगावर शहारा उभा राहिला. जर वेळीच पुढे गेलो नसतो, तर तो प्रवास अखेरचा ठरला असता असे ते म्हणाले.
कुटुंबातील कर्ता गमावला
वसई : विमान दुर्घटनेमध्ये एका पादचाºयासह विमानातील चौघांचा मृत्यू झाला. यातील यु वाय एव्हिएशन कंपनीचे टेक्निशियन मनीष पांडे हे वसईचे रहिवासी आहेत. येथील दोस्ती कॉम्प्लेक्स परिसरातील कर्मा इमारतीत ते आई व पत्नीसह मागील सहा महिन्यांपासून राहात होते. वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होत. त्यांचा स्वभाव शांत होता. त्यांच्या परिवारात ते एकटेच कमाविणारे होते. त्यांच्या मृत्युमुळे पांडे कुटुंब निराधार झाले आहे.
डोळ्यांदेखत
तो जळत होता...
लहानाचा मोठा याच भागात झालो. विमानाचे आवाज आम्हाला नेहमीचे. इमारतीवरूनच त्यांची जाण्याची दिशा. घरी जेवायला आलो असता, स्फोटाचा आवाज झाला. खाली धाव घेतली. पुढे काही अंतरावर आगीच्या लोळाने झाड पेटले. त्यात पाण्यात पेट्रोल वाहिल्याने आग तशीच पुढे आली. याच अग्नितांडवात एक जण डोळ्यांदेखत जळताना दिसला. त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तो त्यात खाक झाला, असे प्रत्यक्षदर्शी जयेश सघोई यांनी सांगितले.