...अन् सुरक्षारक्षकाने सलमान खानला रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 07:24 AM2021-08-21T07:24:16+5:302021-08-21T07:24:38+5:30
Salman Khan : अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ आगामी टायगर ३ सिनेमाच्या चित्रिकरणासाठी रशियाला रवाना होत होते.
मुंबई : मुंबई विमानतळावरील एका सुरक्षारक्षकाने चक्क सलमान खानला रोखल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. सुरक्षा तपासणीचे सर्व निकष पूर्ण केल्याशिवाय आपल्याला आत जाता येणार नाही, असे या सुरक्षारक्षकाने सांगितल्यानंतर सलमाननेही त्याच्या सूचनांचे पालन केले.
अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ आगामी टायगर ३ सिनेमाच्या चित्रिकरणासाठी रशियाला रवाना होत होते. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सलमान मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वारावर दाखल होताच चाहत्यांनी त्याला घेरले. या गर्दीतून वाट काढत तो आत प्रवेश करणार इतक्यात तेथे तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने त्याला रोखले.
सुरक्षा तपासणी पूर्ण केल्याशिवाय आपण आत जाऊ शकत नाही, असे त्याने सलमानला ठणकावून सांगितले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सर्व अवाक झाले. सलमाननेही आढेवेढे न घेता त्याच्या सुचनांचे पालन केले. याबाबतचा व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्या सीआयएसएफ जवानाच्या धाडसाचे कौतुक केले.