...अन् तिने गमावले दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:30 AM2018-03-14T02:30:25+5:302018-03-14T02:30:25+5:30
साडीच्या मोहात ६० वर्षीय वृद्धेला दागिने गमावण्याची वेळ आल्याची घटना रविवारी पवईत घडली.
मुंबई : साडीच्या मोहात ६० वर्षीय वृद्धेला दागिने गमावण्याची वेळ आल्याची घटना रविवारी पवईत घडली. आमचा शेठ सर्वांना मोफत साड्या वाटत असल्याचे सांगून ठगांनी या वृद्धेला पदपथावर बसवले. गरीब दिसायला हवे म्हणून गळ्यातील दागिने काढण्यास सांगितले आणि हातचलाखीने दागिने घेऊन पसार झाले.
पवई परिसरात जयवंती सीताराम शिंदे (६०) या कुटुंबीयांसोबत राहतात. रविवारी सकाळी ११च्या सुमारास त्या तुंगा गाव परिसरात फिरण्यासाठी बाहेर पडल्या. एक तरुण त्यांच्याकडे आला, आमचा शेठ साड्या वाटत आहे, भरपूर लोक साड्या घेऊन गेले आहेत, तुम्ही पण चला... असे सांगितले.
थोड्या अंतरावर गेल्यानंतर ठगाने त्यांना तुम्ही गरीब दिसायला हवे, तुमच्या गळ्यातील सोन्याची माळ, हातातील अंगठी काढून पाकिटात ठेवा, असे सांगितले; आणि शिताफीने ते दागिने स्वत:कडे घेतले. त्याच वेळी आणखी एक तरुण तेथे धडकला. त्यानेही वृद्धेची अधिक विचारपूस केली. आणि संधी साधून दोघेही तेथून पसार झाले.
शिंदे यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना सांगितले. पवई पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.