...आणि ती ‘माँ’ झाली!
By admin | Published: January 21, 2016 02:58 AM2016-01-21T02:58:32+5:302016-01-21T02:58:32+5:30
काम करायची इच्छा असेल तर अगदी कोणत्याही वयात तुम्ही काम करू शकता याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनोरमा आजी. वयाची नव्वदी पार केली तरी
लीनल गावडे, मुंबई
काम करायची इच्छा असेल तर अगदी कोणत्याही वयात तुम्ही काम करू शकता याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनोरमा आजी. वयाची नव्वदी पार केली तरी अजूनही ती कोणावर विसंबूून नाही. स्वत: कमवलेल्या पैशात ती कष्टाची मीठ-भाकर सुखाने खाते आहे. तिने आयुष्यात अनेक दु:खे पाहिली, पण संसाराचे सुख तिला लाभले नाही. परंतु आपल्या प्रेमळ स्वभावामुळे ती अनेकांची ‘माँ’ झाली आहे.
मनोरमा जग्गर यांचा जन्म १९२२ साली सुरतमधील मांडवी या गावी झाला. दहा बहिणी आणि त्यापाठीवर झालेले तीन भाऊ असा भला मोठा परिवार, मुलींना दुय्यम मानणाऱ्या त्या समाजात मुलीचे लग्न झटपट लावून दिले जात असे. त्यामुळे वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचे लग्न आई-वडिलांनी वयाने १० वर्षे मोठ्या असलेल्या मुलाशी लावून दिले. पण लग्नानंतर ५ वर्षांतच पतीने त्यांच्या अंगावर असलेल्या पांढऱ्या चट्ट्यामुळे त्यांना सोडून दिले. पतीने सोडून दिले तरी त्यांची उमेद काही कमी झाली नाही. त्यांनी थेट मुंबई गाठली. भांडुपला असणाऱ्या बहिणीकडे त्या मोठ्या अपेक्षेने गेल्या. बहिणीने आसरा दिला. परंतु आत्मसन्मानामुळे ‘फोकट का खाना कभी हजम नही होता’, म्हणून त्यांनी कांजूर येथील सरबत कंपनीत काम मिळवले.
त्यानंतर त्यांना आनंद केमिकल्स या कंपनीत काम मिळाले. या कंपनीत कामाला असताना अचानक एके दिवशी त्यांचा हात मशिनमध्ये अडकला, त्यांच्या हाताला प्रचंड दुखापत झाली. हाताचे हाड असे काही तुटले की, हात बरा होईल, अशी अपेक्षा नव्हती. पण त्यांची कामाची जिद्द आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्या या खडतर प्रवासात अनेकांची साथ त्यांना लाभली.
हाताचा अपघात झाल्यानंतर समाजसेविका सुखटणकर यांनी आजींना लंगडा, लुळा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर योग्य ते उपचार करून घेतले. हात संपूर्ण बरा होईपर्यंत निवांत राहणे आजींना रुचणारे नव्हते. या दरम्यान रेसकोर्ससमोर राहणाऱ्या एका युरोपियन महिलेच्या घरी एका हाताने त्यांनी मोठ्या जिद्दीने काम केले.