मनीषा म्हात्रे
मुंबई : एका घरात घुसून जबरी चोरीसह हत्येचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रंगेहाथ पकड़ून पोलीस ठाण्यात आणले. चौकशी केली. आणि दोन दिवसाच्या कोठड़ीनंतर हा सराइत गुन्हेगार कोरोनाबाधित निघाल्याने तपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे. बांगुरनगर पोलीस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात तपास करणाऱ्या २० ते २५ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणीची मागणी केली आहे. अटक आरोपी हा गोरेगाव येथील भगतसिंग झोपडपट्टीतील रहिवाशी असून, २० एप्रिलला बांगुर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात घुसून जबरी चोरीसह, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दोन दिवसानंतर संबंधित आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानुसार दिवस पाळीवरील कर्मचाऱ्यांनी त्याला तळोजा कारागृहात नेले. मात्र कोरोना चाचणीशिवाय आत घेणार नसल्याचे सांगत कारागृह विभागाने त्यांना पुन्हा माघारी धाडले. संबंधित आरोपीला पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर दिवस पाळीवरील कर्मचारी घरी निघून गेल्यानंतर रात्रपाळी वरील कर्मचाऱ्यांनी त्याला पुन्हा दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करत घडलेला घटनाक्रम सांगितला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने आरोपीला जे जे रुग्णालयात दाखल करून त्याची कोरोना चाचणी करण्यास सांगितले. पुढे अहवालातून त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत रुग्णालयाकडून तळोजा कारागृहाला कळविण्यात आले. तेथून ही बाब बांगुरनगर पोलीस ठाण्याला समजताच त्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे आरोपीला पकडणारे, त्याच्याकडे चौकशी करणारे, कोर्टात ने-आण करणाऱ्या 20 ते 25 पोलिसांसह कोर्ट परिसरातील कर्मचाऱ्यांनी धसका घेतला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्याची मागणी वरिष्ठ पोलीस निरिक्षकाकड़े केली आहे. त्यानुसर काही अधिकाऱ्यांची चाचणी करण्यात आली असून लवकरच त्याचा अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे हा नवीन धोका पोलिसांसमोर उभा राहिला आहे.
कोरोना चाचणी महत्त्वाचीच... कुठल्याही आरोपीला कारागृहात जमा करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी होणे गरजेचे आहे. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एका मुळे अन्य कैदयांना कोरोनाची लागण होवू नये म्हणून कोरोनाचाचणी महत्त्वाची असल्याचे तळोजा कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ क़ुर्लेकर यांनी सांगितले.