मुंबई - मुलीचा व्हिसा तसेच सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी सुरतच्या व्यावसायिक कुटुंबीयांनी मर्सिडीजमधून आज मुंबई गाठली. मुंबईत मुलीच्या व्हिसाचे काम उरकून ते मंदिराच्या दिशेने निघाले. त्याच दरम्यान सायन परिसरात मांजरीच्या ओरडण्याचा आवाज कानी पडला. त्यांनी सर्वत्र पाहिले मात्र पिल्लू दिसले नाही. घटनास्थळी वाहतूक पोलिसांसह सायन पोलिसांनी धाव घेत या आवाजाचा शोध घेतला. कारमध्ये शोधाशोध केली. मात्र, दोन तासांच्या शोधानंतरही हाती काहीच लागले नाही. अखेर त्यांनी शोरूममध्ये गाडी नेली. तेथे तिला पूर्ण उघडण्यात आले आणि अखेर सहा तासांनंतर इंजीनमध्ये अडकलेल्या मांजरीच्या पिल्लाची सुखरूप सुटका झाली.
मूळचे सुरतचे रहिवासी असलेले जयेश जयवंत टेलर हे मुलगी आणि पत्नीसोबत शुक्रवारी सकाळी मुंबईत आले. मुलगी शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार असल्याने तिचे व्हिसाचे काम करून ते सकाळी १० च्या सुमारास सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेने निघाले. सायन हॉस्पिटल परिसराजवळ त्यांच्या कानावर मांजरीचा आवाज पडला. त्यांनी गाडी बाजूला उभी करून शोध सुरू केला. संपूर्ण गाडी पिंजून काढली. मदतीला पोलिसांनाही बोलावून घेतले. वाहतूक पोलीसही तेथे आले. तब्बल २ तास त्यांनी मांजरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती दिसत नव्हती. आवाज येत होता. अखेर जयेश यांनी संबंधित कारच्या कर्मचाºयाशी संपर्क साधला आणि गाडी थेट कलिनामध्ये नेण्यात आली. तेथे ती पूर्ण उघडून तब्बल सहा तासांनी गाडीच्या इंजिनातून या मांजरीच्या पिल्लाची सुटका करण्यात आली. प्राणिमित्रांच्या मदतीने तिला प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. मांजरीला जीवनदान मिळाले आणि देवाचेच दर्शन झाल्याचे जयेश यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी सिद्धिविनायकला न जाता थेट घर गाठले.