...आणि थेट आला तिच्या मृत्यूचा कॉल, लग्नाच्या ६ महिन्यांतच संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 08:22 AM2023-02-14T08:22:00+5:302023-02-14T08:31:21+5:30
मृत्यूच्या काही तासांपूर्वी मांडली होती व्यथा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लग्नात पाच लाख हुंडा आणि दुचाकीसाठी सासरच्या मंडळींकडून नवविवाहितेला जाच सुरू झाला. आठ महिन्यांची गर्भवती असताना मारहाण झाली. अखेर छळाने परिसीमा गाठल्याने तिने, ‘बाबा खूप त्रास होतोय.. सासरच्या मंडळीच्या मागण्या पूर्ण करा’, असा कॉल वडिलांना केला. वडिलांकडून पैशांची जमवाजमव सुरू असतानाच काही तासांतच त्यांना मुलीच्या मृत्यूचा कॉल आल्याची धक्कादायक घटना धारावीत घडली आहे. यामध्ये हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याच्या आरोपातून धारावी पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
मूळची उत्तर प्रदेशची रहिवासी असलेली रोशनी सरोज (२४) या विवाहितेचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी मे महिन्यात तिचा धारावीत राहणाऱ्या कन्हैयालाल सरोजशी (२६) विवाह झाला. लग्नाच्या काही दिवसांतच पतीसह सासरच्या मंडळींकडून पाच लाख हुंडा आणि दुचाकीसाठी तगादा लावण्यात आला. शिवीगाळ, मारहाण सुरू झाली. ही बाब माहेरच्या मंडळीकडून समजताच त्यांनी सासरच्या मंडळींना समजूत काढली. मात्र, तरीदेखील छळ सुरूच होता. मुलगी गर्भवती राहिल्याने तिच्यावरील अत्याचार थांबतील, अशी आशा माहेरच्या मंडळींना होती. मात्र, आठ महिन्यांची गर्भवती असतानाही तिला मारहाण सुरू होती. सासरची मंडळी घरी आलेल्या माहेरच्या मंडळींना भेटण्यासही विरोध करण्यास सुरुवात केली. सासरच्या मंडळीकडून छळ वाढताच, शनिवारी तिने वडिलांना कॉल करून खूप त्रास होत आहे.
सासरच्या मंडळींच्या मागण्या पूर्ण करा असे सांगून फोन ठेवून दिला. त्यानंतर, वडिलांनीही मुलीसाठी पैसे जमविण्यासाठी धडपड सुरू केली. त्यातच मुलीच्या मृत्यूच्या कॉलने वडिलांना धक्का बसला आहे. धारावी पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे.
पतीला अटक
वडिलांनी केलेल्या आरोपावरून हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून, सासू सासऱ्यांबाबत अधिक तपास
सुरू आहे.
- विजय वासुदेव कांदळगावकर,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, धारावी पोलिस, ठाणे
लग्नाच्या ६ महिन्यातच संपविले आयुष्य
धारावीपाठोपाठ देवनार आणि वांद्रेमध्ये सासरच्या जाचाला
कंटाळून विवाहितेने आयुष्य संपविले आहे. देवनारमध्ये लग्नाच्या सहा महिन्यातच विवाहितेने आत्महत्या केली आहे.