Join us  

... अन् शिवजयंतीची तारीख १९ फेब्रुवारी ठरली; विलासरावांनी केली होती घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 8:44 AM

शिवजयंती ही तारखेनुसार करायची की तिथीनुसार हा वाद नेहमीच शिवजयंतीला असायचा.

मुंबई - महाराष्ट्रासह जगभरात विविध ठिकाणी आज शिवजयंती साजरी होत असून उत्साह दिसून येत आहे. शासनाच्यावतीने किल्ले शिवनेरी येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंतीचा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी शिवनेरी गडावर राज्यभरातून शिवप्रेमी आणि दिग्गजांची मांदियाळी जमली आहे. राज्य सरकारच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येत असलेल्या शिवजयंतीचे यंदा २५ वे वर्षे असून दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख निश्चित केली आहे. 

शिवजयंती ही तारखेनुसार करायची की तिथीनुसार हा वाद नेहमीच शिवजयंतीला असायचा. मात्र, तिथीनुसार शिवजयंती करताना तारखेचा घोळ होत. त्यामुळे, तारखेनुसार शिवजयंती करण्यासंदर्भात शासनाने मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, शासनाने समिती नेमून शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख निश्चित केली आहे. राज्यात २०० साली आघाडी सरकारच्या काळात १९ फेब्रुवारी १६३० ही शिवजयंतीची अधिकृत तारीख घोषित करण्यात आली आहे. तेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री १९ फेब्रुवारीला शासकीय कार्यक्रमांना आणि किल्ले शिवनेरीवर उपस्थित असतात.

सन १९६६ मध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शिवजंयतीबाबतच्या तारखेच्या वादावर तोडगा काढण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी इतिहास तज्ञांची एक समिती स्थापन केली. समितीतल्या तीन सदस्यांनी फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ही शिवजयंतीची अधिकृत तारीख असल्याचं सांगितलं. तर एका सदस्यानं वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ म्हणजेच ६ एप्रिल १६२७ ही शिवजयंतीची तारीख असल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे, दोन वेगळे मतप्रवाह असल्यामुळं शिवजयंतीची अधिकृत तारीख त्यावेळी जाहीर झाली नाही. त्यानंतर, युती सरकारच्या काळात पुन्हा याचे प्रयत्न झाले.

राज्यात मनोहर जोशींच्या नेतृत्वात युतीचं सरकार आल्यानंतर त्यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्याचं ठरवलं. त्यांनीही तज्ञांची समिती नेमली, याच्या अध्यक्षपदी इतिहासतज्ञ गजानन मेहेंदळे होते. या समितीनं दिलेल्या अहवालात तिथीप्रमाणं फाल्गुन वद्य तृतीया आणि तारखेनं १९ फेब्रुवारी या दिवसांवर शिक्कामोर्तब झालं. मात्र, शासनदरबारी अधिकृत निर्णय घेण्यात आला नाही. त्यासाठी, आघाडी सरकार यावं लागल्याचं इतिहासातील घटनांवरुन दिसून येते. 

राज्यात आघाडी सरकार आलं होतं. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा पुन्हा शिवजयंतीच्या तारखेचा मुद्दा चर्चेत आला. विलासरावांनी आणि तत्कालीन शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांनी पुढाकार घेतला. मेहेंदळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या निष्कर्षांना विचारात घेऊन ९ फेब्रुवारी २००० साली विलासरावांनी राज्य सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करेल असा निर्णय जाहीर केला आणि शिवनेरीवर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली. त्यावर्षीपासून १९ फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी करतात. 

तारीख जाहीर झाल्यानंतर विलासराव म्हणत...

राज्यात १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेच्यावतीने आजही तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. त्यावरुन, नाव न घेता विलासराव देशमुख शिवसेनेला टोला लगावत. ''तारीख जाहीर झाल्यानंतरही काही लोक १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करत नाहीत. ते पंचागाप्रमाणं शिवजयंती साजरी करतात. मला अभिमान आहे की, माझ्या कार्यकाळात हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. शासनाच्या वतीनं एकच तारीख जाहीर झाली आहे आणि तेव्हाच शिवजयंती साजरी होईल.'', असे विलासराव म्हणत. 

टॅग्स :शिवजयंतीमहाराष्ट्रशिवसेना