... आणि चिमुकला रात्रभर बागेतच झोपला! विद्याविहार येथे उघडकीस आला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 07:31 AM2023-08-07T07:31:25+5:302023-08-07T07:31:36+5:30
अमित हा सहा वर्षांचा असून आपला ९ वर्षांचा मोठा भाऊ अर्पित याच्याबरोबर तो शनिवारी ११ वाजता खेळण्यासाठी बाहेर गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोठ्या भावासोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय मुलाचा शोध घेण्यास टिळकनगर पोलिसांना यश आले आहे. खेळण्यात व्यस्त असताना मोठा भाऊ निघून गेला. त्यानंतर, दिवसभर खेळून खेळून दमून गेल्याने सहा वर्षांचा अमित बागेतच झोपला. पण त्यामुळे अमितच्या कुटुंबीयांची रात्रभर झोप उडाली. अखेर पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर सकाळी तो बागेमध्ये सुखरूप निद्राधीन असलेला मिळाला, अमितच्या घरच्या सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
अमित हा सहा वर्षांचा असून आपला ९ वर्षांचा मोठा भाऊ अर्पित याच्याबरोबर तो शनिवारी ११ वाजता खेळण्यासाठी बाहेर गेला. रात्री साडेआठच्या सुमारात मोठा अर्पित घरी आला, पण अमित काही आला नाही. यामुळे घरच्यांचा डोळ्याला डोळा लागला नाही, सर्व चिंतेत होते. अखेर पोलिसांकडे धाव घेतली. अमितचे आई वडील बिगारी काम करत असून सोमय्या महाविद्यालयाच्या कंपाउंडलगत राहतात.
रात्री घर सापडेना म्हणून...
अमितच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर तपास अधिकारी अमोल साळुंखे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. पोलिसांकडून गस्त वाढवली गेली, परिसरातील सुरक्षारक्षकांना याबाबत लक्ष ठेवण्यास सांगितले. अखेर, रविवारी सकाळी मुलगा येथीलच बागेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पालकांसह बागेत धाव घेत छोटुकल्या अमितला सुखरूप स्थितीत ताब्यात घेतले. दमूनभागून तो बागेतच झोपी गेल्याचे पोलिसांना सांगितले. पण, रात्र असल्यामुळे घराकडे जाण्याची वाटही लक्षात आली नसावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.