Join us

...आणि ते निघाले खरे पोलीस; ‘मुंबई ते कर्नाटक’ अपहरणाच्या थरारनाट्यावर पडदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 12:33 AM

पोलीस असल्याची बतावणी करून, हॉटेल व्यवस्थापकाचे अपहरण केल्याचा कॉल पोलिसांच्या नियंत्रण कक्षावर खणाणला.

मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करून, हॉटेल व्यवस्थापकाचे अपहरण केल्याचा कॉल पोलिसांच्या नियंत्रण कक्षावर खणाणला. नियंत्रण कक्षावरून गस्तीवर असलेल्या पोलिसांना अलर्ट गेला आणि पोलिसांनी व्यवस्थापकाच्या मोबाइल लोकेशनवरून पाठलाग सुरू केला. पाठलाग करत पोलीस कर्नाटकच्या धारवाडपर्यंत पोहोचले. तेथे गेल्यानंतर ते खरे पोलीस निघाल्याने पोलिसांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. कर्नाटक पोलिसांनी कुठलीही माहिती न दिल्यामुळे पोलिसांची दमछाक झाली.शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरीतील कोडिविटा रोडवर असणाऱ्या तरंग हॉटेलचा व्यवस्थापक प्रभाकर (३४) याला कारमध्ये बसवून अपहरण झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार, एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आले. हॉटेल मालक संदीपकुमार बंगेरा आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी वरील घटनाक्रम सांगून, त्या चौघांनी दिलेला फोन नंबर पोलीस पथकाला दिला.एमआयडीसी पोलीस पथकाने त्या नंबरवर कॉल केला असता, समोरून बोलणाºया व्यक्तीने कर्नाटक पोलीस असल्याचे सांगितले आणि प्रभाकर याला ताब्यात घेतले असून, धारवाड न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगत कॉल कट केला. त्यामुळे पोलिसांना संशय आला. कर्नाटक पोलिसांकडून आरोपी ताब्यात घेताना स्थानिक पोलीस ठाण्यात काहीही माहिती दिली नव्हती. या प्रकरणी हॉटेल मालक बंगेरा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून तपास सुरू केला. तपासात कार धारवाडला पोहोचल्याची माहिती मिळताच, वरिष्ठांच्या आदेशाने तपास पथक रविवारी दुपारी तेथे धडकले. तेथील न्यायालयात धाव घेतली, तेव्हा प्रभाकर आरोपीच्या पिंजºयात उभा असल्याचे दिसून आले. धारवाडमधील जगदीश गाणगा यांचे २ लाख त्याने ठकवले होते. याच प्रकरणात त्यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी कारवाई केल्याचे उघड झाले आणि तोतया पोलिसांनी अपहरण केल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.>कर्नाटक पोलिसांना पाठविले चौकशीचे पत्रआरोपीला ताब्यात घेण्यापूर्वी कर्नाटक पोलिसांनी कळविणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. हा गुन्हा तेथे वर्ग करण्यात येईल, तसेच या प्रकरणी चौकशीचे पत्र कर्नाटक पोलिसांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांनी दिली.