Join us

...अन् सुरू झाला बाेटीमधील खलाशांना वाचवण्याचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:06 AM

माहीम कोळीवाड्यातील चार मित्रांच्या धाडसामुळे दाेघांना जीवदानलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेकांचे अताेनात नुकसान झाले. काहींना ...

माहीम कोळीवाड्यातील चार मित्रांच्या धाडसामुळे दाेघांना जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेकांचे अताेनात नुकसान झाले. काहींना जीव गमवावा लागला, तर काही समुद्रात अडकले, बेपत्ता झाले. माहीम काेळीवाड्याजवळील अरबी समुद्रातही मृत्यूच्या दाढेत असेच दाेन खलासी अडकले हाेते. मात्र चार मित्रांचे प्रसंगावधान, धाडसाने त्यांना नवजीवन मिळाले. अनिकेत प्रदीप तरे, सचिन कांतीलाल मोरे, निखिल प्रदीप तरे आणि मनिष दिलीप तरे अशी या चार धाडसी मित्रांची नावे आहेत.

माहीम कोळीवाड्यातील एक बोट त्यातल्या दोन खलाशांसह अरबी समुद्रातल्या तौत्के चक्रीवादळात साेमवारी दुपारी ४च्या सुमारास सापडली. दहा फूट उंचीहून अधिक मोठ्या लाट्या उसळत होत्या. वाऱ्याच्या वेग इतका प्रचंड हाेता की ताे झाडांनाही मुळापासून उन्मळून पडायला भाग पाडत हाेता. समारे मृत्यू आवासून उभा हाेता. ते दाेघेही घाबरून गेले हाेते. मात्र आपल्याच दाेन काेळीबांधवांवर ओढावलेली ही परिस्थिती पाहून ते चार मित्र पुढे सरासावले. साेबत लाइफ जॅकेट घेऊन त्या दोन खलाशांना वाचविण्यासाठी समुद्रात उतरले. सोबत एक मोठा दोरखंडही घेतला. चार टप्प्यावर ते चार; अशा पद्धतीने शाेध सुरू झाला. दुपारी ४ वाजता सुरू झालेल्या या प्रयत्नांना रात्री ८.३० वाजता यश आले आणि त्या दोन खलाशांचे जीव वाचले.

दरम्यान, येथील खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या दोन खलाशांना वाचविण्यासाठी लाइफ गार्ड किंवा हेलिकॉप्टरची मदत मागवण्यात आली होती. मात्र यातही अनेक अडथळे आले, असे त्यांनी सांगितले.

संकटात अडकलेल्या काेणाचाही जीव वाचवणे, यालाच तर माणुसकी म्हणतात. त्यात ते दाेघे तर आमचेच काेळी बांधव हाेते. काहीही करून त्यांना वाचवायचेच, हे एकच लक्ष्य त्यावेळी आमच्या नजरेसमाेर हाेते. आम्ही बोटीची मदत घेतली नाही, कारण समुद्राला उधाण आले हाेते. साेसाट्याचा वारा वाहत हाेता. लाटा प्रचंड वेगाने उसळत हाेत्या. अशा या निसर्गाच्या रुद्रावतारात ते दोन जीव बोटीत मृत्यूशी लढा देत हाेते. त्यांना वाचविणे गरजेचे हाेते. आम्ही पाण्याचा दाब कमी होण्याची वाट पाहिली, जिवाची बाजी लावून समुद्रात उडी घेतली. ते दोन खलाशी आमच्यापासून म्हणजे माहीम कोळीवाड्यापासून दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर होते. लाटांच्या वेगावर मात करत आणि पाणी कापत आम्ही अथक प्रयत्नांती सुमारे साडेचार तासांनंतर त्यांच्यापर्यंत पाेहाेचलाे. ते दाेघे नजरेच्या टप्प्यात दिसताच क्षणाचाही वेळ न दवडता दोरखंडाच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. त्यांना लाइफ जॅकेट दिले. त्यानंतर सर्वजण सुखरूप किनाऱ्यावर आलाे. त्या दाेघांना वाचविता आले याचा आनंद लाखमाेलाचे समाधान देऊन गेला, असे त्या चार मित्रांनी सांगितले.

.....................................................................