Join us

...आणि सूरजच्या आयुष्याला कलाटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 5:17 AM

सेरेब्रल पाल्सीने त्रस्त; शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात बालरक्षकांना यश

- सीमा महांगडे मुंबई : सेरेब्रल पाल्सीमुळे त्याला नेहमीच आधाराची गरज लागायाची. एकट्याला चालता येत नव्हते. इतर काही कामही करता येत नव्हते. त्यामुळे अखेर सूरजची शाळा सुटली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आईला धुणी-भांडी करायची. तिला घरी त्याच्याजवळ थांबताही येत नव्हते. मात्र गेल्या वर्षापासून तो शाळेत जाऊ लागला. आता त्याच्या आजारावर औषधोपचारही सुरू झाले आहेत. मुंबईतील बालरक्षक चळवळीमुळे सूरजसारख्या सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलाला नव्याने शिक्षणाची संधी तर मिळालीच; शिवाय त्याच्या आजारावरही औषधोपचार मिळत आहेत.मुंबईत आणि राज्यभरात शाळाबाह्य मुलांसाठी बालरक्षक चळवळ उभी राहत आहे. मुंबई विभागाची आणि त्यातील बालरक्षकांची कामगिरी उल्लेखनीय आहे. जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी असलेल्या आणि त्यामुळे शाळाबाह्य झालेल्या सूरजला शिक्षण निरीक्षक बबिता जाधव यांनी शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा सामील होण्यास मदत केली. शाळाबाह्य मुलांचा शोध घेताना सूरज घाडगे एके दिवशी घरी एकटाच असलेला त्यांना दिसला. रोज शाळेत ने-आण करणे शक्य नसल्याने त्याला विशेष मुलांच्या शाळेतून काढून तीन वर्षे घरीच ठेवण्यात आले होते. मात्र बबिता जाधव आणि त्यांच्या बालरक्षकांच्या टीमने त्याच्या घरच्यांची समजूत काढून त्याला जवळच असलेल्या चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये दाखल केले. मुख्याध्यापिका, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी साऱ्यांनी त्याला सहकार्य केले. त्यामुळे सूरज त्या वातावरणात आठवड्यातले चार दिवस का होईना शिक्षण घेऊ लागला. आपल्या इतर दोन मुलांप्रमाणे सूरजही शिक्षण घेत असल्याने आईलाही आनंद झाला.सूरज स्वत:च्या पायावर चालावा, त्याच्या हालचालीत सुधारणा व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असल्याने त्याला मदतीसाठी प्रयत्न केले जात होते. सूरजला मदत म्हणून सर्व शिक्षा अभियानांतर्गत कृत्रिम पायही देण्यात आले, मात्र ते त्याच्या पायाशी सुसंगत होत नव्हते. त्याच्या आजारामुळे त्याच्या पायाची हालचाल होत नव्हती. अखेर बालरक्षक टीमने चेंबूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी समन्वय साधत त्याच्यावरील उपचार करण्याचा प्रयत्न सुरू केला. या प्रयत्नांना यश म्हणून अखेर त्याच्या सेरेब्रल पाल्सीवरील उपचार २४ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. त्यामुळे बालरक्षक बबिता जाधव आणि त्यांच्या टीमला सूरजला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासोबत आयुष्याच्या प्रवाहातसुद्धा नव्याने सुरुवात करण्याची संधी द्यायला यश मिळाले असेच म्हणावे लागेल.सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय?‘सेरेब्रल पाल्सी’ या शब्दाची फोड सेरेब्रल म्हणजे मेंदूशी संबंधित आणि पाल्सी म्हणजे अर्धांगवायू अशी होते. सेरेब्रल पाल्सी हा विकार हालचालींशी संबंधित असून यात स्नायूंची शक्ती, त्याचे नियमन आणि अतिरिक्त ताठरतेमुळे हालचालींवर मर्यादा येतात. सेरेब्रल पाल्सी असणारे मूल स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. रुग्णाची आकलनक्षमता, बुद्धी, स्वभाव, संवाद, वाचा, संवेदना, श्रवण तसेच दृष्टीवर याचा परिणाम होतो.

टॅग्स :आरोग्य